Vinesh Phogat Win Haryana Election 2024: कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली आहे. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे.


जुलाना मतदारसंघात विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि योगेश बैरागी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विनेश फोगाट योगेश बैरागी यांच्यापेक्षा पिछाडीवर होती. पण पुढील सर्व मतमोजणीच्या फेरीत विनेश फोगाट आघाडीवर राहिली आणि विजयी झाली. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर 6 सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट दिली.






विनेश फोगाटला किती मते मिळाली?


विनेश फोगाटला जुलाना येथील जनतेने पाठिंबा दिला असून तिला एकूण 65080 मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी कॅप्टन सिंग वैरागी यांना 59065 मतांवर समाधान मानावे लागले आणि ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी यांना केवळ 1280 मते मिळाली.


विनेश फोगाटच्या विजयानंतर बजरंग पुनिया काय म्हणाला?


देशाची कन्या विनेश फोगाटला विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन....ही लढत केवळ एका जुलाना जागेसाठी नव्हती...केवळ पक्षांमधील लढत नव्हती...हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध होता. आणि यामध्ये विनेश फोगाट जिंकली, असं कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला.






विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम-


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटने उपांत्य फेरीपर्यंत मोठ्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वीच विनेश फोगाटला जास्त वजन भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विनेश फोगाटने 6 सप्टेंबर रोजी तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


संबंधित बातमी:


Haryana Vidhansabha Election Results 2024: काँग्रेसच्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला; हरियाणातील अनिरुद्ध चौधरी आघाडीवर की पिछाडीवर?