ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या आशेवर पावसाचं पाणी, एकही बॉल न खेळता झिम्बॉब्वे सुपर 8 मध्ये पोहोचणार, जाणून घ्या समीकरण
ZIM vs IRE Match: ऑस्ट्रेलियाला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानं झिम्बॉब्वे विरुद्ध आयरलँड यांच्यातील सामन्याकडे लक्ष लागलं आहे.

T20 World Cup Super 8 Scenario कोलंबो: टी 20 वर्ल्ड कप सध्या रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. सुपर 8 मध्ये सहा संघांनी स्थान मिळवलं आहे. ब गटातून श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत स्थान निश्चित केलं. यानंतर आता ब गटातून सुपर 8 मध्ये कोण पोहोचणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. झिम्बॉब्वे पोहोचणार की ऑस्ट्रेलिया धमाकेदार पुनरागमन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलियाचे सलग दोन पराभव झाल्यानं त्यांचा सुपर 8 चा मार्ग खडतर झाला आहे. झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांच्यातील सामन्याच्या निकालावर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र, पल्लेकल्लेमध्ये जोरदार पाऊस सुरु असल्यानं मॅच सुरु झालेली नाही. झिम्बॉब्वे आणि आयरलँड मॅच रद्द झाल्यास ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाऊ शकते. तर झिम्बॉब्वे सुपर 8 मध्ये धडक मारेल.
ZIM vs IRE : झिम्बॉब्वे सुपर 8 मध्ये पोहोचणार?
टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 साठी ब गटातील गणित रोमांचक बनलं आहे. श्रीलंकेनं तीन सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. झिम्बॉब्वे चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, ऑस्ट्रेलिया एका विजय आणि दोन पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 2 गुण आहेत, त्यांचं नेट रनरेट देखील झिम्बॉब्वे पेक्षा कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या सुपर 8 मधील आशा जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आयरलँड विरुद्ध झिम्बॉब्वेचा पराभव होणं हा आहे.
ऑस्ट्रेलियाचा आता केवळ एक सामना शिल्लक आहे. ते राहिलेली मॅच जिंकले तर 4 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. झिम्बॉब्वेकडे 4 गुण आहेत. जर झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक गुण मिळतील. यामुळं झिम्बॉब्वेचे 5 गुण होतील. जर, पावसामुळं झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांच्यातील सामना रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यांना स्पर्धेबाहेर जावं लागू शकतं.
झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यास ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर जातील.ऑस्ट्रेलियाला यापूर्वी देखील ग्रुप स्टेजमधून बाहेर जावं लागलं होतं. 2009 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर गेला होता. त्यावेळी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज क गटातून पुढच्या फेरीत पोहोचले होते. तर, ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता.

























