T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक अंतिम टप्यात आलं असून या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला पराभवाची धुळ चारून अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) नेट प्रॅक्टिसदरम्यान हर्षल पटेलचा (Harshal Patel) चेंडू लागल्याची माहिती समोर आली. पण त्याला झालेली दुखापत किरकोळ असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. इंग्लंडविरुद्ध मोठ्या सामन्यापूर्वी विराटचं तंदुरुस्त असणं भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा देणारी माहिती आहे. 


इंग्लंडविरुद्ध सामन्यापूर्वी विराटला हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दुखापत झाली. यानंतर तो सराव सोडून मैदानाबाहेर गेला.पण आता मिळालेल्या वृत्तानुसार विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त आहे. विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याचं दुखापतग्रस्त होणं, भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जाईल. दरम्यान, भारताच्या अनेक विजयात विराट कोहलीनं महत्वाची भूमिका बजावलीय. 


नॉकआऊट सामन्यात कोहलीचा अप्रतिम रेकॉर्ड
कोहलीनं टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासह एकूण तीन वेळा फलंदाजीसाठी मैदानात आलाय.या तिन्ही डावांमध्ये त्यानं 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सेमीफायनल किंवा फायनलमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलनं दोन डावात दोन अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय ख्रिस गेल, मार्लन सॅम्युअल्स, शाहिद आफ्रिदी आणि कुमार संगकारा यांनीही प्रत्येकी दोन अर्धशतकं झळकावली आहेत.


विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
यंदाच्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली सध्या अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेतील पाच सामन्यात विराट कोहलीनं 140 च्या स्ट्राईक रेटनं आणि 123 च्या सरासरीनं सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. कोहलीनं पाच डावांत तीन अर्धशतकं झळकावली आहेत . कोहली इंग्लंडविरुद्ध आपला फॉर्म कायम ठेवत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.


पाकिस्तानची फायनलमध्ये धडक
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला गेला. ज्यात पाकिस्ताननं सात विकेट्स राखून  विजय मिळवत फायनल गाठली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजीच निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर पाकिस्ताननं सलामीवीर बाबर आणि रिझवानच्या वादळी खेळीच्या जोरावर हा सामना जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम सामना खेळेल.


हे देखील वाचा-