IND vs AUS, World Cup 2023 Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर (IND vs AUS) विजय मिळवला. यंदाच्या विश्वचषकात सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारताला अंतिम सामन्यात मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने हा सामना चार विकेटच्या मोबदल्यात जिंकला आणि भारतीय खेळाडूंसह कोट्यवधी भारतीयांचा हिरमोड झाला. पराभवानंतर टीम इंडियाला भरमैदानात अश्रू अनावर झाले. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानी मीडिया मात्र, खूश असल्याचं दिसत आहे. हेडने भारतीयांची मनं दुखावली, असं म्हणत 'द डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.


हेडने भारतीयांची मनं दुखावली


विश्वचषक 2023 च्या स्पर्धेतून पाकिस्तानी क्रिकेट संघ साखळी सामन्यांमधूनच बाहेर गेला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगलेल्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. पाकिस्तानी मीडियामध्ये या संदर्भात बातम्या पाहायला मिळत आहेत. 'द डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हटलं आहे की, ''ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकल्याने हेडने भारतीयांची मनं दुखावली.''






पाक मीडियानं काय म्हटलं?


'द डॉन'च्या वृत्तात पुढे लिहिलं आहे की, ''सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या शानदार 137 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी अहमदाबादमध्ये भारतावर सहा गडी राखून विजय मिळवून विक्रमी सहाव्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात विजयासाठी 241 धावांच्या अवघड आव्हानाचा पाठलाग करताना, डावखुऱ्या हेडने स्पर्धेतील आपले दुसरे शतक ठोकण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 47-3 अशी होती. पण त्यानंतर हेडने दमदार खेळी करत सात षटके बाकी असताना  संघाला विजय मिळवून दिला.






पंतप्रधान मोदींचाही उल्लेख


पाकिस्तानी मीडियाने पंतप्रधान मोदींचाही उल्लेख केला आहे. 'द डॉन'च्या वृत्तात म्हटलं आहे की, भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं. मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, ''प्रिय टीम इंडिया, विश्वचषकात तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय वाखानण्या घेण्याजोगा होता. तुम्ही मोठ्या जिद्दीने खेळलात आणि देशाला कायम तुमचा अभिमान आहे.''