मुंबई : विश्वचषकाच्या (WorldCup) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने सात विकेट्स राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या हायवोल्टेज सामन्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलं होतं. तर या सामन्यामध्ये भारताचे गोलंदाज आणि भारताच्या फलंदाजांनी परीक्षा अगदी उत्कृष्ट गुणांनी पास केली. यामध्ये भारताचे फलंदाज जितके तोडीस तोड ठरले तितकेच भारताचे गोलंदाज देखील  पाकिस्तानच्या संघावर वरचढ ठरले. गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला अवघ्या 191 धावांवर रोखलं तर फलंदाजांनी देखील दमदार कामगिरी करत अवघ्या 30.3 षटकातच डाव उरकला. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, आम्ही सुरुवात चांगली केली होती, पण नंतर डाव कोलमडला. तर  भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सामना जिंकल्यानंतरचा आनंद व्यक्त केला. 


काय म्हणाला बाबर आझम?


सामना झाल्यानंतर बाबर आझम याने म्हटलं की, 'आम्ही चांगली सुरुवात केली, चांगली भागीदारी केली. आम्ही फक्त सामान्य क्रिकेट खेळण्याची आणि भागीदारी निर्माण करण्याची योजना आखली होती. पण अचानक भागीदारी कोलमडली आणि आमची योजना पूर्ण होऊ शकली नाही. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, आमचे लक्ष्य 280-290 होते. पण विकेट्स गेल्याने आम्हाला महागात पडले. त्यानंतर आम्ही विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला पण त्यातही आम्ही यशस्वी ठरलो नाही.' 


बाबक आझम याने यावेळी बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचं देखील कौतुक केलं. त्याने यावेळी बोलताना म्हटलं की, 'रोहितने दमदार कामगिरी केली. त्याने एक उत्कृष्ट खेळी केली असून त्याचं आम्हाला कौतुक आहे.' 


रोहित शर्मानं काय म्हटलं?


भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'गोलंदाजांनी आमच्यासाठी चांगली खेळी केली. या खेळपट्टीवर  आम्ही 280 किंवा 290 चं लक्ष्य ठेवलं होतं. पण गोलंदाजांमुळे अवघ्या 191 पर्यंतच पाकिस्तानला अडवलं. त्यानंतर फलंदाजांना संधी मिळाली. त्यांनी देखील त्यांचं काम चांगलं केलं. पण यातच आम्ही हुरळून जाणार नाही. कारण ही खूप मोठी स्पर्धा आहे. सामना जिंकल्याचा आनंद आहेच, पण आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे.'


जसप्रीत बुमराहला 'मॅन ऑफ द मॅच' 


भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला आहे. त्याने पाकिस्तानचा महत्त्वाचा शिलेदार रिझवानला माघारी धाडलं. त्यानंतर त्याने शादाब खान याची विकेट घेतली. तर त्याने सात षटकात फक्त 19 धावा दिल्या. 


हेही वाचा : 


World Cup 2023: भारताचा आठवावा प्रताप! हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला 7 विकेटने चिरडले