IND vs PAK : नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच कोलंबोत होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वांचं लक्ष लागलेल्या मॅचसंदर्भात दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचमध्ये अर्शदीप सिंग ऐवजी कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी द्यावी, असं गावस्कर म्हणाले. नामिबियाच्या फलंदाजांनी अर्शदीप सिंगची जोरदार धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज झाले आहेत. 

Continues below advertisement

अर्शदीप सिंगला खेळवू नका: सुनील गावस्कर

सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्टसवर एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की आमच्या सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगला त्याच्या चार ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. शिवम दुबेनं दोन ओव्हर गोलंदाजी केली तर हार्दिक पांड्यानं चार ओव्हर गोलंदाजी केली. यातून संकेत मिळतात की कुलदीप यादव पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगची जागा घेऊ शकतो, असं सुनील गावस्कर म्हणाले. श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर आहेत. भारतानं तीन फिरकी गोलंदाज खेळवल्याचा इतिहास आहे. मला वाटतं कुलदीप यादवला पाकिस्तान विरुद्ध अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळेल, असं सुनील गावस्कर म्हणाले. 

सुनील गावस्कर म्हणाले की सूर्यकुमार यादव यानं पाकिस्तान विरूद्धच्या मॅचचा विचार करुनच गोलंदाजीत बदल केले. हार्दिक पांड्यानं पहिली ओव्हर टाकली यातून संकेत मिळतात की कदाचित अर्शदीप सिंग पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही. वरुण चक्रवर्तीनं केवळ दोन ओव्हर गोलंदाजी केली, त्यानं पूर्ण गोलंदाजी केली असती तर त्याला पाच किंवा सहा विकेट मिळाल्या असत्या.  सुनील गावस्कर म्हणाले की वरुण चक्रवर्तीची चांगली बाब म्हणजे जेव्हा त्याला गोलंदाजी करण्यास सांगितलं जातं तेव्हा तो विकेट घेतो. अक्षर पटेलनं तीन ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या हा चांगला संकेत आहे, असंही गावस्कर म्हणाले.  

Continues below advertisement

सुनील गावस्कर संजू सॅमसन बद्दल काय म्हणाले?

सुनील गावस्कर यांनी संजू सॅमसनला वारंवार येणाऱ्या अपयशाबद्दल देखील भाष्य केलं. संजू सॅमसनला अमेरिकेविरुद्ध संघातून वगळण्यात आलं होतं. संजू सॅमसनला  अभिषेक शर्मा आजारी असल्यानं नामिबिया विरुद्ध संधी मिळाली होती. संजू सॅमसन यानं  8 बॉलमध्ये 22  धावा केल्या होत्या. याबाबत सुनील गावस्कर यांनी म्हटलं की संजू सॅमसनला क्रीजपासून दूर जाऊन खेळल्यानं अडचण होत आहे, असं गावस्कर म्हणाले. संजू सॅमसनची समस्या तंत्राची आहे, तो क्रीजमध्ये खूप मागं जातो, असंही सुनील गावस्कर म्हणाले.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.