T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) वादळी खेळी भारतासाठी फायनलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.
भारताच्या पराभवाची पाच कारणं
भारताची सलामी जोडी पुन्हा फ्लॉप
इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. केएल राहुल पाच चेंडूत 5 धावा करून बाद झाला. तर, रोहित शर्मानं 28 चेंडूत 27 धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांचा स्ट्राईक रेट 100 किंवा त्याहून कमी होता. टी-20 क्रिकेटमध्ये विरुद्धसंघासमोर विशाल लक्ष्य ठेवायचं असल्यास सलामीवीरांची भूमिका महत्वाची ठरते. सलामीवीरांना पावर प्लेचा फायदा घेत पहिल्या सहा षटकात जास्तीत जास्त धावा करायच्या असतात. पण इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. या सामन्यात भारतानं पहिल्या सहा षटकात फक्त 38 धावा केल्या होत्या.
मोठ्या सामन्यात सूर्या अपयशी
टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं सातत्यानं धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध सामन्यातही सूर्याकुमार यादवच्या बॅटीमधून धावांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, या सामन्यात सूर्याकुमार 14 धावा करून माघारी परतला. ज्यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. आदील राशीदच्या चेंडूवर मोठ्या शॉट खेळण्याचा प्रयत्नात सूर्या आऊट झाला.
भारताची खराब गोलंदाजी
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडसमोर 168 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, हे लक्ष्य रोखण्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. या सामन्यात भारताला एकही विकेट्स मिळवता आला नाही.
बटलर-हेल्सची वादळी खेळी
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं सुरुवातीपासूनच वादळी खेळी केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि इंग्लंडच्या संघाला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिल्यानंतर माघारी परतले.
इंग्लंडची तगडी गोलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंड संघानं चांगली सुरुवात केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. दरम्यान, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात भारतीय फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. ख्रिस जॉर्डन आणि सॅम करनसह सर्व गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केली.
हे देखील वाचा-