Eng Vs Pak : इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक, शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, हॅरी ब्रूकचे ऐतिहासिक शतक
England vs Pakistan Match Update : इंग्लंडच्या या विजयामुळे पाकिस्तानच्या स्पर्धेतील आशा धूसर झाल्या असून उपांत्य फेरीसाठीची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे.

England vs Pakistan Highlights : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर 2 विकेट्सने नाट्यमय विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. कर्णधार हॅरी ब्रूकच्या (Harry Brook) ऐतिहासिक शतकामुळे इंग्लंडने शेवटच्या षटकात लक्ष्य गाठले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) 4 विकेट्स घेतल्या, मात्र त्याची कामगिरी विजयासाठी अपुरी ठरल्याचं दिसून आलं.
इंग्लंडचा शेवटच्या षटकात विजय (England vs Pakistan Last Over Thriller)
पल्लेकेले येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात 165 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट बाद झाला. पॉवरप्लेपूर्वी जोस बटलर आणि जेकब बेथेलही माघारी परतले. टॉम बॅन्टन फक्त 2 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंड अडचणीत सापडला होता.
आफ्रिदीवर ब्रूक भारी (Harry Brook Century)
अशा परिस्थितीत कर्णधार हॅरी ब्रूकने जबाबदारी स्वीकारत दमदार खेळी साकारली. ब्रूकने 50 चेंडूत शतक पूर्ण करत टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात शतक झळकावणारा पहिला कर्णधार होण्याचा मान पटकावला. त्याने 100 धावा पूर्ण केल्यानंतर लगेचच शाहीन आफ्रिदीने त्याला क्लीन बोल्ड केले, पण तोपर्यंत सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला होता.
आफ्रिदीने 4 षटकांत 30 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद नवाजने 19व्या षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या चाहत्यांची धडधड वाढवली होती. मात्र 20व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंड सलग पाचव्यांदा सेमीफायनल (T20 World Cup 2026 Semifinal)
या विजयानंतर इंग्लंडने सलग पाचव्यांदा टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या या विजयामुळे पाकिस्तानच्या स्पर्धेतील आशा धूसर झाल्या असून उपांत्य फेरीसाठीची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे.
भारतासाठी 'करो या मरो'ची स्थिती
दुसरीकडे, भारताच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या मार्गामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा मोठा पराभव झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. 26 फेब्रुवारी रोजी भारत आणि झिम्बाब्वेमध्ये निर्णायक सामना होणार आहे. हा सामना कोणत्याही परिस्थितीत भारताला जिंकावं लागणार आहे. त्याचसोबत 1 मार्च रोजी वेस्ट इंडिज विरोधातील सामनाही भारताला मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. तरच भारत उपांत्य फेरीमध्ये पोहोचू शकतो.
ही बातमी वाचा:
























