World Cup 2023: अहमदाबादच्या रणांगणात भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) महामुकाबला होणार आहे. विश्वचषकावर (World Cup 2023) कोण नाव कोरणार? याची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू आहे. अशातच पुण्यातील एका ज्योतिषाने विश्वविजेता कोण होणार याचं भाकित केलं आहे. विशेष म्हणजे, ज्योतिषांनी याआधी 2023 विश्वचषकातील भारताच्या दहा सामन्यांचं केलेलं भाकित, खरं ठरलंय. आता फायनलआधीही त्यांनी विश्वविजेता कोण? याचं भाकित केलं आहे, त्याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


'2023 चा वर्ल्डकप भारतच जिंकणार'


ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी 11 ऑक्टोबरला विश्वचषक 2023 फायनलच्या सामन्याचं भाकित वर्तवलं होतं. भारताच्या 10 सामन्यांचं भाकित देखील त्यांनी याआधी ज्योतिष अंकातून वर्तवलं होतं, जे खरं ठरलं. सलग साखळी सामने, सेमी फायनल आणि भारताचा अंतिम वर्ल्ड कप सामना भारतच जिंकेल आणि भारत यावर्षीचा विश्वविजेता होईल, असं भाकित ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केलं आहे. 2023 चा वर्ल्डकप भारतच जिंकणार, असं भाकित ज्योतिषांनी वर्तवलं आहे.


'मंगळाचं परिवर्तन सामन्यासाठी अनुकूल'


खेळासाठी मंगळ हा ग्रह खूप महत्त्वाचा असतो आणि गेले दीड-दोन महिने मंगळाचं स्थान हे भारतासाठी खूप अनुकूल आहे, असं ज्योतिषांनी सांगितलं. भारताची रास मकर आहे आणि गेल्या दीड महिने मंगळ हा तूळ राशीत, म्हणजे भारताच्या दशम स्थानी असल्यामुळे भारत अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करेल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.


'भारत 100 टक्के विश्वविजेता बनणार'


16 नोव्हेंबर रोजी मंगळ हा वृश्चिक राशीत आलेला आहे. भारताच्या पत्रिकेमध्ये हा राभ स्थानात आलेला आहे, म्हणजे मोठी इच्छा पूर्ण करणारं असं हे मंगळाचं भ्रमण सध्या सुरू आहे. योगायोगाने आता उद्याचा सामना आणखी अनुकूल का असणार? तर उद्या चंद्र सुद्धा मकर राशीमध्ये आहे, त्यामुळे मकर राशीत असलेला चंद्र हा भारताला 100 टक्के विश्वविजेता बनवेल, यात काही शंका नसल्याचं ज्योतिषांनी म्हटलं आहे.


'सुरुवातीला संघर्ष, सेकंड हाफमध्ये यश मिळणार'


उद्याचा (19 नोव्हेंबर) जो सामना होणार आहे, हा सुरुवातीला थोडा संघर्षाचा होणार आहे. उत्तरार्धामध्ये, म्हणजेच सेकंच हाफमध्ये या सामन्यात भारताचं पूर्णपणे वर्चस्व राहणार आहे. '125 करोड भारतीयांची इच्छा पूर्ण करणारा दिवस' असं उद्याच्या दिवसाचं वर्णन करता येईल, असं ज्योतिष म्हणाले.


'रोहित शर्माचं कर्णधारपद ठरणार महत्त्वाचं'


भारताच्या पत्रिकेबरोबर भारतीय संघाचा जो कर्णधार आहे, रोहित शर्मा. याची पत्रिका देखील या काळामध्ये बलवान होत आहे. 3 एप्रिल 1987, यासह रवि मेष राशीमध्ये आहे आणि या रविवरुन गुरुचं भ्रमण सध्या होत आहे, हे अतिशय उत्तम असल्यामुळे रोहित शर्माचा देखील खेळात उत्तम उपयोग होणार आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद अंतिम सामन्यात भारताला यश मिळण्यात महत्त्वाचं ठरणार आहे.


विराटचे रेकॉर्ड राहणार अविरत


यासोबतच, विराट कोहलीची देखील रास सिंह आहे. त्याला देखील सध्या गुरुचं भ्रमण अनुकूल असल्यामुळे वर्ल्ड कपमध्ये त्याने खुप रेकॉर्ड केले आहेत. सर्वोच्च धावसंख्या असेल, सचिनचा रेकॉर्ड मोडणं असेल यासह उद्याच्या सामन्यात त्याची आणखी चांगली खेळी होऊ शकते. 


'खेळाडूंच्या पत्रिकेत शुभ योग'


या दोघांच्या जोडीला शमी असेल, के. एल. राहुल असेल किंवा इतर खेळाडू असतील, यांच्या पत्रिकेत देखील काही ना काही शुभ योग आपल्याला या काळात बघायला मिळत आहेत. जेणेकरुन आपण तिन्ही पातळीवर, म्हणजेच बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा फिल्डिंग असेल, सर्व पातळीवर भारतीय संघ हा उत्तम ठरलेला आहे आणि याची प्रचिती आपल्याला उद्या पण येणार आहे. 100 टक्के हा सामना भारत जिंकणार आहे आणि 2023 चा वर्ल्ड कप विजेता हा भारतच असणार आहे, हे भाकित पुन्हा एकदा वर्तवण्यात आलं आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पराभूत संघही होणार मालामाल, पाहा कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार?