इंग्लंड : ऑइन मॉर्गनच्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. तर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची आजवरची ही चौथी वेळ ठरली. त्यामुळे आता रविवारी लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अशी अंतिम लढत रंगणार आहे.


बर्मिंगहॅममधील आजच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 224 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करताना 33 व्या षटकातच आठ विकेट्स राखून विजय साजरा केला.


सलामीवीर जेसन रॉयची 65 चेंडूत 85 धावांची खेळी इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरली. रॉयच्या या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. जॉनी बेरस्टॉने 34, जो रुटने 49 आणि ऑइन मॉर्गनने 45 धावांची साथ दिली.



त्याआधी इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत 223 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं 85 धावांची झुंजार खेळी उभारली. तर अॅलेक्स कॅरीनं 46 धावांचं योगदान दिलं. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. इंग्लंडच्या आदिल रशिद आणि ख्रिस वोक्सनं प्रत्येकी तीन तर जोफ्रा आर्चरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.