Team India Hockey Jersey Controversy Marathi News : एफआयएच (FIH) पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2026 पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. खरंतर, भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा निळा रंग बदलून आता भगवा करण्यात आला आहे. हॉकी इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारतीय संघाची ही नवीन भगवी जर्सी जाहीर केल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार विरेन रासकिन्हा याने या निर्णयावर जोरदार टीका करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
नेमका काय आहे वाद?
ऑगस्ट 2026 मध्ये बेल्जियम आणि नीदरलँड येथे संयुक्तपणे हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने भारतीय पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांसाठी भगव्या रंगाची जर्सी लाँच केली. जर्सीचा रंग बदलताच माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, "हॉकी इंडियाने भारतीय हॉकीसाठी खूप चांगले काम केले आहे, पण जर्सीचा रंग बदलण्याचा हा निर्णय अत्यंत लाजीरवाणा आहे. भारतीय संघाची ओळख ही नेहमीच ब्लू राहिलेली आहे. मी स्वतः अनेक वर्षे अत्यंत अभिमानाने ही निळी जर्सी घातली आहे. चाहतेही भारतीय खेळाडूंना निळ्या रंगातच पाहू इच्छितात. मग अचानक या ऑरेंज रंगाचा काय लॉजिक आहे?"
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी काय म्हणाल्या?
या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, जर्सीचा रंग बदलणे असो किंवा शिक्षण धोरणातून इतिहास बदलण्याचा प्रयत्न असो, देशातील तरुणांना हे स्पष्टपणे समजते आहे.
हॉकी इंडियाने काय दिले स्पष्टीकरण?
जर्सीवरून सुरू झालेल्या वादानंतर हॉकी इंडियाने यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे. हॉकी इंडियानुसार, जर्सीचा रंग नीळ्यावरून भगवा करण्याचा निर्णय हा भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या शिफारसीनुसार घेण्यात आला आहे. खेळाडू आणि कोचिंग स्टाफला या नव्या भगव्या रंगाबद्दल कोणतीही तक्रार किंवा अडचण नाही. भारतीय खेळाडू या नव्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे उत्सुक आणि तयार आहेत.
1975 नंतर दुसऱ्या चषक जिंकण्याची संधी
भारतीय हॉकी संघाने 1975 मध्ये एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. आता 2026 मध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडे 51 वर्षांनंतर दुसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळवण्याची मोठी संधी असेल. नव्या भगव्या जर्सीत उतरणारा भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -
