Aniket Varma: आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला असला तरी, अनिकेत वर्माच्या रूपाने संघाला एक असा फिनिशर सापडला आहे, जो भविष्यात विरोधी संघांसाठी एक दुःस्वप्न ठरू शकतो. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेव्हा अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डीसारखे अनुभवी खेळाडू स्वस्तात बाद झाले, तेव्हा 24 वर्षीय अनिकेतने अवघ्या 18 चेंडूंमध्ये 43 धावांची धडाकेबाज खेळी करून हैदराबादला 201 धावांपर्यंत पोहोचवले.  

Continues below advertisement

पदार्पणाच्या हंगामापासूनच चमकदार कामगिरी

गेलं वर्ष अनिकेत वर्मासाठी स्वप्नवत होते. आपल्या पदार्पणाच्या हंगामात, त्याने 12 डावांमध्ये 166.19 च्या स्ट्राईक रेटने 236 धावा करून आपली क्षमता सिद्ध केली. आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच डावात त्याने ज्या प्रकारे मोठे फटके खेळले, त्यावरून त्याची प्रतिभा दिसून आली. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने हैदराबादला मधल्या फळीत ती ताकद दिली आहे, ज्याची संघाला खूप गरज होती.

जन्म झाशी, क्रिकेट प्रवास मध्य प्रदेशातून

उत्तर प्रदेशातील झाशी येथे जन्मलेला अनिकेत वर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. विशेष म्हणजे, आयपीएल 2025 पर्यंत अनिकेतने मध्य प्रदेशसाठी फक्त एकच टी20 सामना खेळला होता, पण आज त्याच्या प्रतिभेमुळे त्याच्या नावावर 25 टी 20 सामने आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 164.81 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने 356 धावा केल्या आहेत. अनिकेतने अद्याप एकही प्रथम-श्रेणी किंवा लिस्ट ए सामना खेळलेला नाही, तरीही तो टी20 फॉरमॅटमध्ये एक स्टार म्हणून उदयास आला आहे.

Continues below advertisement

वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचे निधन

अनिकेत वर्माच्या यशामागे संघर्षाची एक लांब आणि वेदनादायक कहाणी आहे. अनिकेत अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याने आपल्या आईला गमावले. एका वर्षानंतर, त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाने कुटुंब उद्ध्वस्त झाले. या कठीण काळात, आजी आणि काकाने त्याला मायेचा आधार देत मोठं केलं. काकांनी कर्ज काढून दिलेल्या साथीनं अनिकेतचं आज स्वप्न साकार झालं आहे. 

एमपीएल ते आयपीएल

मध्य प्रदेश प्रीमियर लीग 2024 मध्ये भोपाळ लेपर्ड्सकडून खेळताना अनिकेत वर्माने केलेल्या धुमाकुळीमुळे त्याचे नशीब पालटले. तिथे त्याने केवळ पाच डावांमध्ये 205 च्या स्ट्राइक रेटने 244 धावा केल्या. त्याच्या पॉवर-हिटिंग क्षमतेमुळे सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. आज 30 लाख रुपये किमतीचा तोच खेळाडू हैदराबादसाठी कोट्यवधी रुपयांचा मॅचविनर ठरला. 

इतर महत्वाच्या बातम्या