PM Modi on Vinesh Phogat Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यासाठी गेलेल्या 117 खेळाडूंचा गट आता भारतात परतला आहे. यावेळी ऑलिम्पिकमध्ये अनेक छोटे-मोठे वाद झाले. पण ज्यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची. तिला तिच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. विनेशसोबतच्या या घटनेनंतर तमाम भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. 


विनेशने या प्रकरणी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) मध्ये याचिका देखील दाखल केली होती, ज्यावर तिचे अपील 14 ऑगस्ट रोजी फेटाळण्यात आली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधून परतलेल्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाटबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. 


विनेश ही देशाची शूर मुलगी 


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली. यामध्ये एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश होता. पॅरिसहून परतलेल्या खेळाडूंची मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पंतप्रधान विनेश फोगाटसाठी म्हणाले, विनेश ही देशाची शूर मुलगी आहे. तिने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे.


निवृत्तीची घोषणा


विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो फ्री-स्टाईल गटातील सुवर्णपदक लढतीतून बाहेर पडल्यानंतर कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. विनेशने तिच्या कारकिर्दीत आशियाई क्रीडा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी कुस्तीमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.