राजकोट: ऑक्टोबर हीटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. राजकोटच्या मैदानावरही हीट आणखी वाढणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आणि जेसन होल्डरची वेस्ट इंडियन फौज पहिल्या कसोटीच्या निमित्तानं गुरुवारी 4 ऑक्टोबरला राजकोटच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकणार आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर. आयसीसी क्रमवारीतली ही तफावत आणि घरच्या मैदानावर खेळण्याची संधी यामुळे टीम इंडियाचं पारडं या कसोटीत जड असल्याचं दिसून येतंय.

भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी ही ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला अखेरची संधी आहे. त्यामुळं बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनानं विंडीजविरुद्धच्या मालिकेत नवे पर्याय तपासून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईच्या पृथ्वी शॉसह हनुमा विहारी, रिषभ पंत, मयांक अगरवाल आणि मोहम्मद सिराज हे भारतीय ड्रेसिंगरुममध्ये दाखल झालेले नवे पाहुणे या मालिकेत खेळताना दिसतील.

इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनऐवजी पृथ्वी शॉला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते. इंग्लंड दौऱ्यातल्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान पृथ्वीला भारतीय ड्रेसिंगरुम शेअर करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळं मयांक अगरवालपेक्षा पृथ्वीला राजकोट कसोटीत खेळवण्यात येईल असं दिसतं.

पुढे वाचा - 





कर्नाटकच्या मयांक अगरवालनं गेल्या रणजी मोसमात धावांचा अक्षरश: रतीब घातला होता. त्यानं आठ सामन्यांत 1160 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळं निवड समितीनं विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांकचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांनी इंग्लंड दौऱ्यातल्या पाचव्या कसोटीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्षवेधक कामगिरी बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारताची नवी आशा ठरु शकतो.

टीम इंडियानं 2013 सालापासून भारतभूमीवर सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तर वेस्ट इंडिजला 2002 सालापासून भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. त्यामुळं राजकोटच्या रणांगणातही विराट कोहलीच्या टीम इंडियाचं पारडं जड ठरलं तर आश्चर्य वाटणार नाही.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेचं वेळापत्रक

भारत मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 3 ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान राजकोटमध्ये आणि दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिकेत भिडणार आहेत. वनडे सीरिजचा पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहाटी, दुसरा 24 ऑक्टोबरला इंदूर, तिसरा 27 ऑक्टोबरला पुणे, चौथा 29 ऑक्टोबरला मुंबई आणि पाचवा 1 नोव्हेंबरला थिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर

संबंधित बातम्या

विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रोहित बाहेर, हरभजनचा संताप   

करुण नायरचे आरोप निराधार, एमएसके प्रसाद यांचं स्पष्टीकरण  

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा