नॉर्थ साऊण्ड (वेस्ट इंडीज) : मिताली राजच्या महिला ब्रिगेडने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला धूळ चारली असताना विराट कोहलीच्या टीम इंडियाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजविरोधातल्या
चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 11 धावांनी पराभव झाला. या विजयासह वेस्ट इंडिजनं स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

तळाच्या फजंदाजांची उडालेली तारांबळ आणि महेंद्रसिंग धोनीची संथ खेळी यामुळे भारताला 190 धावांचं माफक लक्ष्यही गाठता आलं नाही. अखेरच्या षटकांमध्ये विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. भारत 178 धावांवर सर्वबाद झाला.

भारताकडून पाकिस्तानी महिला संघाचा 74 धावात खुर्दा

महेंद्रसिंग धोनीनं अर्धशतक पूर्ण केलं खरं, पण त्यासाठी त्यानं दीडशेच्या वर चेंडू खर्च केले. धोनीआधी अजिंक्य रहाणेनं देखील 60 धावांची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त कोणताच फलंजाद चांगली कामगिरी बजावू शकला नाही. केदार जाधवलाही फारशी फटकेबाजी करता आली नाही.

केदार जाधव नंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणलं. पांड्या आणि धोनीने 43 धावांची भागीदारीही केली, मात्र जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. जेसन होल्डरनं भारताचे पाच फलंदाज बाद केले.