मुंबई : भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने तामीळनाडू प्रीमियर लीगच्या (टीएनपीएल) सामन्यात असा चेंडू टाकला, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. अश्विनचा हा चेंडू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीएनपीएलमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून खेळणाऱ्या अश्विनने सोमवारी (22 जुलै) मदुराई पँथर्सविरोधात शानदार गोलंदाजी करत चार षटकात 16 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.

अश्विनच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या डिंडीगुल ड्रॅगन्सने हा सामना 30 धावांनी जिंकला. डिंडीगुल ड्रॅगन्सने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. त्याच्या उत्तरादाखल मदुराई पँथर्स संघाला 20 षटकात 9 विकेट गमावून 152 धावाच करता आल्या. डिंडीगुलच्या नारायण जगदीशनची 'सामनावीर' म्हणून निवड झाली. त्याने 51 चेंडूवर 12 चौकार आणि एका षटकाच्या मदतीने नाबाद 87 धावा केल्या.


याच सामन्यात अश्विनने 'मिस्ट्री बॉल' फेकला. अश्विनने अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू आपल्या मागे लपवला आणि डाव्या हाताने कोणतीही अॅक्शन केली नाही. हवेत फुगा सोडतो, त्याप्रमाणे हा चेंडू दिसला. फलंदाजालाही हा चेंडू उशिराने समजला आणि त्याने चेंडू हवेत टोलवला. परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडून फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अश्विन डावातील अखेरच्या षटकात गोलंदाजी करत होता आणि विरोधी पक्षाला विजयासाठी 32 धावांची गरज होती. त्याने या षटकात केवळ दोन धावा केल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या. अश्विनच्या डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचा या लीगमधला हा सलग दुसरा विजय ठरला.