मुंबई: रिओ पॅरालम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात मरियप्पन थांगावेलूने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला. भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवल्याने त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेटचा तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही मरियप्पनचे अभिनंदन करताना त्याची आणि त्याच्या आईच्या जिद्दीची कथा सांगणारे ट्वीट केले.

 

वीरुच्या हटके ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीसंदर्भात एका ब्रिटीश पत्रकाराने उडवलेल्या खिल्लीला, चोख प्रत्युत्तर देऊन, त्याची बोलती बंद केली होती.

 

आता वीरुने रिओ पॅरालम्पिकमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मरियप्पनची आणि त्याच्याच्या आईने मरियप्पनला यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या कष्टाची माहिती सांगणारे ट्वीट केले. सध्या या दोन्ही ट्वीटलाही त्याच्या चाहत्यांसोबतच अनेकांकडून दाद मिळत आहे.

 

यातील मरियप्पनच्या जिद्दीची माहिती देताना वीरु म्हणतो की, ''मरियप्पन पाच वर्षांचा असताना, एका ट्रक धडकेत त्याच्या पायाच्या गुडघ्याखालील भागाला गंभीर दुखापत झाली होती. मरियप्पनच्या जिद्दीने ही अलैकिक कामगिरी केली आहे. त्याला अभिवादन.''

 

 

तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये वीरुने मरियप्पनच्या या अलैकीक कामगिरीसाठी त्याच्या आईने घेतलेल्या कष्टाची माहिती दिली आहे. तो सांगतो की, ''मरियप्पनची आई सरोजा ही एक भाजी विक्रेती आहे. वास्तविक, ही त्या कुटुंबांना चपराक आहे, जे आपल्या परिस्थितीला आयुष्यभर दोष देत बसतात.''

 



 

संबंधित बातम्या

रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण आणि कांस्य