नवी दिल्ली : इंग्लंडमधल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं पुन्हा मिळवायची तर अनिल कुंबळेंसमोर वीरेंद्र सहवागचं मुख्य आव्हान असणार आहे. कारण भारताचा हा धडाकेबाज सलामीवीर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान राखून मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दाखल झाला आहे.

भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेची मुदत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपत आहे. पण त्याला नव्या प्रशिक्षकाच्या निवड प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी आहे. त्यामुळे अनिल कुंबळेसह वीरेंद्र सहवाग, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर टॉम मूडी आणि इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांच्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी चुरशीची शर्यत होईल.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश आणि भारताच्या 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या संघाचा प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेवर नाराज

बीसीसीआयचं विद्यमान अधिकाऱ्यांना अनिल कुंबळे पसंत नाही. बीसीसीआयचे हे अधिकारी चॅपियन्स ट्रॉफी न खेळण्याची धमकी देत होते, तेव्हा कुंबळेनेच सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीला संदेश पाठवून, खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. ही बाब बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आवडली नाही.

याशिवाय कसोटी, वन डे आणि टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळांसाठी वेगळा करार करण्याची कुंबळेची मागणी बीबीसीआयला आवडली नव्हती. बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्या ‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150 टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने केली आहे.

कोहली आणि कुंबळेमध्ये फूट!

विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज आहेत. अनिल कुंबळे ज्यापद्धतीने संघाला मार्गदर्शन करतो, त्यावर खेळाडू नाखुश आहेत. कुंबळे संघात वट निर्माण करत आहे. ह्या वागणुकीमुळेच खेळाडूंनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कुंबळेची तक्रार केली आहे. टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये कुंबळेच्या अॅटिट्यूडला कंटाळले आहेत. खेळाडूंच्या मते, कुंबळे ड्रेसिंग रुममधील त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे.