विराट कोहलीच्या 'ट्रेलर- द मूव्ही'चं गूढ अखेर उकललं!
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2018 05:06 PM (IST)
विराटने लाँच केलेल्या 'राँग' (Wrogn) या कपड्यांच्या ब्रँडची ही जाहिरात असल्याचं समोर आलं आहे
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 'ट्रेलर- द मूव्ही' नावाचा एक व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे असलेला व्हिडिओ पाहून विराट बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र अखेर विराटने आपल्या फॅन्सच्या मनातील शंकांना पूर्णविराम दिला आहे. विराटने लाँच केलेल्या 'राँग' (Wrogn) या कपड्यांच्या ब्रँडची ही जाहिरात असल्याचं समोर आलं आहे. विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवसाचं निमित्त साधत 21 सप्टेंबरला नव्या लूकचं पोस्टर शेअर केलं होतं. सोशल मीडियावर हे पोस्टर काही वेळातच व्हायरल झालं. हे पोस्टर नेमकं कशाचं आहे, हे विराटने गुलदस्त्यात ठेवलं होतं. 28 सप्टेंबरला या पोस्टरचा खुलासा करणार असल्याचं विराटने त्यावेळी ट्वीटमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे विराटच्या आगामी सिनेमा किंवा डॉक्युमेंट्रीचं हे पोस्टर असावं, असे तर्कवितर्क चाहते लढवत होते. 28 सप्टेंबरऐवजी दोन दिवस आधीच विराटने गूढ उलगडलं. 'पोस्टरवर आम्ही right date टाकली होती, मात्र व्हिडिओ रिलीज करण्यासाठी आम्ही #Wrogn date निवडली' असं विराटने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.