मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
विराटनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं या सामन्यात 32 वी धाव घेऊन रैनाचा विक्रम मोडला.
सुरेश रैनानं आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये 4558 धावांचा रतीब घातला आहे. विराटनं मुंबईविरुद्ध नाबाद 92 धावांची खेळी उभारली. त्यामुळं त्याच्या नावावर आता 153 सामन्यांमध्ये 4619 धावांचा इमला उभा राहिला आहे. त्यात 4 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
यंदाच्या मोसमातही विराट कोहली 4 सामन्यांमध्ये 201 धावा करून आघाडीवर आहे.
मुंबईचा बंगलोरवर विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार खेळीनंतरही, वानखेडे स्टेडियमवरच्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सनं मोसमातला पहिला विजय साजरा केला.
मुंबईनं या सामन्यात बंगलोरचा 46 धावांनी धुव्वा उडवला.
कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने घरच्या मैदानात अवघ्या 52 चेंडूंत दहा चौकार आणि पाच षटकारांसह 94 धावांची खेळी उभारली.
रोहित आणि सलामीवीर एविन लुईसनं तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. त्यात लुईसचा वाटा 65 धावांचा होता.
रोहित आणि लुईसच्या खेळीने मुंबईला 20 षटकांत सहा बाद 213 धावांची मजल मारून दिली.
त्यानंतर बंगलोरला विजयासाठी 214 धावांचं आव्हान झेपलं नाही. विराट कोहलीनं 62 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 92 धावांची झुंजार खेळी उभारुनही बंगलोरला 8 बाद 167 धावांचीच मजल मारता आली.