Vinesh Phogat: पॅरिस ऑलंपिकच्या फायनलमध्ये गेलेली कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. हरियाणात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूका आहेत. मागच्या २०० दिवसांपासून शंभू बॉर्डरवर हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांची कुस्तीपटू विनेश फोगाटने भेट घेतल्यानं आता विनेश राजकारणात प्रवेश करणार का? तिनं राजकारणात प्रवेश केला तर कोणत्या पक्षात ती प्रवेश करणार? हरियाणाच्या राजकारणात विनेश फोगाटच्या प्रवेशानं काही फरक पडेल का अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.


विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्यातील राजकीय वातावरण शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर ढवळून निघाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनात विनेश सहभागी झाल्यानं राजकारणात ती प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


विनेश फोगाट करणार का राजकारणात प्रवेश?


रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंसोबत विनेशही सहभागी झाली होती. कुस्तीपटूंच्या मुद्दयावरून 2024 च्या लोकसभेत विरोधी पक्षांनी भाजपला घेरले होते. आता आंदोलनातील शेतकऱ्यांची विनेशने भेट घेतल्यानं हरियाणाच्या राजकारणात विनेशची एन्ट्री होणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.


शेतकऱ्यांशी काय केली चर्चा?


13 फेब्रुवारीपासून हरीयाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा राजधानीकडे निघाला होता. शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखून धरल्याने मागील 200 दिवसांपासून शेतकऱ्यांचे किमान आधारभूत किमतीसाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, विनेश फोगाटने शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांची मुलगी पाठीशी असल्याचं सांगितलं.  आपल्यालाच आपली लढाई लढावी लागणार असल्याचं सांगत तिनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी सरकारला विनंती केली. यावेळी मीही दिल्लीत आंदोलनाला अनेक दिवस बसले होते. पण आज इथे आल्यावर दिसले की, पहिल्या दिवसासारखाच उत्साह शेतकऱ्यांमध्ये आहे. आता आमच्या कुटुंबालाही लढण्याची युक्ती कळली आहे. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावेच लागते.” असेही ती म्हणाली.


विनेशला राजकीय पार्श्वभूमी


विनेश फोगाट ही कुस्तीपटू असली तरी तिला राजकारण नवे नाही. ती राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आली आहे. विनेशची चुलत बहीण बबीता फोगटने 2019 मध्ये दादरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण यात तिचा पराभव झाला होता. राजकारणात प्रवेश करणार का असे विचारल्यावर तिने मला राजकारणाची फार माहिती नाही. मी खेळाडू आहे. त्याविषयी विचारले तर सांगेन असे उत्तर दिले होते.