Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज याबाबत निकाल जाहीर केला. बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता होताच फटाके फोडून समर्थकांनी जल्लोष केला. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Women Wrestlers Alleged Physical Harassment Case)
सत्ताधारी पक्षातील एका शक्तिशाली आणि दबदबा असलेल्या राजकारण्याविरुद्ध रस्त्यावर उतरून एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी आम्हाला प्रचंड धैर्याची गरज भासली. आपल्या राजकीय सत्तेचा आणि बाहुबलाचा वापर करून, बृजभूषण शरण सिंह यांनी अनेक महिला कुस्तीपटूंना धमकावले आणि त्यांच्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडले. तरीही, अनेक महिला कुस्तीपटू ठाम राहिल्या आणि त्यांनी बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कायदेशीर लढा सुरू ठेवला, असं विनेश फोगाट म्हणाल्या.
आमची आशा मावळलेली नाही आणि कुस्तीपटू आपला लढा सुरूच ठेवतील- विनेश फोगाट (Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh)
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना दोषी न ठरवल्यामुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण व्यवस्था, सरकार आणि यंत्रणा बृजभूषण यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला कुस्तीपटूंनी या निकालाच्या विरोधात अपील करण्याचे निर्देश वकिलांना दिले आहेत आणि ते लवकरात लवकर केले जाईल. आमची आशा मावळलेली नाही आणि कुस्तीपटू आपला लढा सुरूच ठेवतील, असं विनेश फोगाट यांनी सांगितले.
कोर्टाने निर्दोष मुक्तता करताच बृजभूषण सिंह काय म्हणाले? (Brij Bhushan Sharan Singh Marathi News)
न्यायालयाच्या या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर, बृजभूषण शरण सिंह म्हणाले, की, आरोप झाल्यानंतर मी पहिल्याच दिवशी म्हणालो होतो की जर कोणताही आरोप सिद्ध झाला किंवा तसा निकाल लागला, तर मी स्वतःला फाशी लावून घेईन. आज न्यायालयाने माझी सन्मानाने निर्दोष मुक्तता केली आहे. माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी ही आनंदाची बाब आहे...आजचा दिवस आनंदाचा आहे, असं बृजभूषण शरण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय? (Brij Bhushan Sharan Singh Women Wrestlers Alleged Physical Harassment Case)
2016 ते 2019 या काळात महासंघाचे कार्यालय, अधिकृत निवासस्थान आणि परदेश दौऱ्यात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. 2023 मध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले होते. आंदोलनानंतर दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र सादर झाले होते आणि खटला सुरू झाला होता. मात्र आज न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी बृजभूषण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांना या प्रकरणातूनदोषमुक्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी सहा वेळा खासदार राहिलेले बृजभूषण शरण सिंह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी पोलिसांनी WFI चे निलंबित सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही आरोपी केले होते.
