वायनाड (केरळ) : विदर्भाने लागोपाठ दुसऱ्या वर्षी रणजी करंडकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेच्या वायनाडमधल्या उपांत्य सामन्यात विदर्भाने यजमान केरळचा एक डाव आणि अकरा धावांनी धुव्वा उडवला. केरळच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब म्हणजे पाच दिवसांचा हा सामना केवळ दीड दिवसांतच आटोपला.

या सामन्यात विदर्भाला पहिल्या डावात 102 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे केरळला डावाचा मारा चुकवण्यासाठी किमान 102 धावांची आवश्यकता होती. पण उमेश यादव आणि यश ठाकूरने केरळचा दुसरा डाव अवघ्या 91 धावांत गुंडाळून विदर्भाला सनसनाटी विजय मिळवून दिला.

वेगवान गोलंदाज उमेश यादव विदर्भाच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. उमेशने पहिल्या डावात सात विकेट्स घेतल्या होत्या. त्याने दुसऱ्या डावात पाच फलंदाजांना माघारी धाडलं.