IPL 2026:आयपीएलचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. या हंगामात, अनेक नवोदित खेळाडूंनी आपापल्या संघांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तुफानी फटकेबाजी केलेला वैभव सूर्यवंशी, प्रिन्स यादव, प्रफुल्ल हिंगे आणि आयुष म्हात्रे यांसारख्या युवा खेळाडूंची चांगलीच चर्चा झाली. असे 10 उदयोन्मुख स्टार या आयपीएलमध्ये चमकले असून जे भविष्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करू शकतात.
1. वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)
IPL 2026 कामगिरी: त्याने 16 सामन्यात 776 धावा कुटल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 237.30 चा होता. यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली.
विशेष विक्रम: 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत त्याने 5 वेळा पन्नाशी (50 धावा) पार केली. अवघ्या 36 चेंडूंत शतक झळकावले. प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादविरुद्ध 29 चेंडूंत 97 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 12 षटकार होते. एका हंगामात सर्वाधिक 72 षटकार मारून त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. 15 व्या वर्षी एका आयपीएल हंगामात 600+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
2. आयुष म्हात्रे (चेन्नई सुपर किंग्स)
वय व पार्श्वभूमी: मुंबईचा 18 वर्षांचा सलामीवीर फलंदाज. ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर चेन्नईने त्याला संघात सामील केले होते.IPL 2026 कामगिरी: दुखापतीमुळे तो केवळ 6 सामने खेळू शकला, पण त्यात त्याने 177.87 च्या स्ट्राईक रेटने 201 धावा केल्या.
विशेष विक्रम: विजय हजारे ट्रॉफीमध्ये 117 चेंडूंत 181 धावा करून लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150+ धावा करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. मुंबईविरुद्ध वानखेडेवर पदार्पण करताना त्याने पहिल्याच सामन्यात 15 चेंडूंत 32 धावांची खेळी केली.
3. अंगकृष रघुवंशी (कोलकाता नाइट राइडर्स)
वय व पार्श्वभूमी: 21 वर्षांचा अंगकृष मूळचा दिल्लीचा आहे, पण क्रिकेट ट्रेनिंगसाठी तो मुंबईत आला. तो 2022 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
IPL 2026 कामगिरी: त्याने 13 सामन्यात 146.52 च्या स्ट्राईक रेटने 422 धावा केल्या आणि 5 अर्धशतके झळकावली.
भूमिका: केकेआरचे सुरुवातीचे गडी लवकर बाद झाल्यानंतर त्याने अनेक सामन्यांमध्ये डाव सावरण्याची आणि सामना शेवटपर्यंत नेण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.
4. मुकुल चौधरी (लखनऊ सुपर जायंट्स)
वय व पार्श्वभूमी: राजस्थानचा 21 वर्षांचा विकेटकीपर-फलंदाज. लखनऊने त्याला 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
IPL 2026 कामगिरी: त्याने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात 10 सामने खेळून 170 धावा केल्या.
विशेष कामगिरी: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 27 चेंडूंत 7 षटकाराहं नाबाद 54 धावांची खेळी केली आणि शेवटच्या चेंडूवर लखनऊला थरारक विजय मिळवून दिला. दबावाच्या परिस्थितीत सामना संपवण्याच्या क्षमतेमुळे तो उत्तम फिनिशर म्हणून उदयास आला.
5. प्रिंस यादव (लखनऊ सुपर जायंट्स)
वय व पार्श्वभूमी: दिल्लीचा 24 वर्षांचा वेगवान गोलंदाज. दिल्ली प्रीमियर लीग आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील चांगल्या कामगिरीनंतर लखनऊने त्याला 30 लाख रुपयांत खरेदी केले.
IPL 2026 कामगिरी: 14 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या. त्याची इकॉनॉमी 8.82 असून सर्वोत्तम कामगिरी 3/32 अशी राहिली.
विशेष कामगिरी: या हंगामातील त्याचा सर्वात मोठा आणि चर्चेचा क्षण म्हणजे त्याने आपल्या वेगवान चेंडूवर विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले होते. तो नवीन चेंडू आणि डेथ ओव्हर्स या दोन्हीमध्ये उत्कृष्ट यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो.
6. प्रफुल हिंगे (सनरायझर्स हैदराबाद)
वय व पार्श्वभूमी: नागपूर, विदर्भचा 24 वर्षांचा हा मध्यमगती गोलंदाज आहे. हैदराबादने त्याला 30 लाख रुपयांत खरेदी केले होते.
विशेष कामगिरी: आयपीएल 2026 च्या 21 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण करताना त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेऊन इतिहास रचला. त्याने पहिल्याच चेंडूवर फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला 'गोल्डन डक' (शून्यावर) बाद केले, त्यानंतर ध्रुव जुरेल आणि प्रेटोरियस यांनाही खाते उघडू दिले नाही. त्याने 2 षटकात अवघ्या 6 धावा देत 4 गडी बाद केले होते. तो अचूक टप्पा आणि बाऊन्ससाठी ओळखला जातो.
7. रसिख सलाम दार (गुजरात टायटन्स)
पार्श्वभूमी व कामगिरी: जम्मू-काश्मीरचा हा वेगवान गोलंदाज या हंगामात गुजरात टायटन्ससाठी डेथ ओव्हर्समध्ये अत्यंत प्रभावी ठरला. अचूक यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल्स टाकण्याच्या कौशल्यामुळे त्याने अनेक महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
8. प्रियांश आर्या (दिल्ली कॅपिटल्स)
पार्श्वभूमी व कामगिरी: या हंगामात इमर्जिंग प्लेयर पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या प्रियांशने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित केले. पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा बनवण्याच्या क्षमतेमुळे तो या हंगामातील एक मोठा शोध ठरला.
9. समीर रिझवी (चेन्नई सुपर किंग्स)
पार्श्वभूमी व कामगिरी: मागच्या हंगामाप्रमाणेच याही हंगामात उत्तर प्रदेशच्या या युवा मधल्या फळीतील फलंदाजाने फिनिशरची भूमिका चोख बजावली. कमी चेंडूंमध्ये मोठे षटकार मारण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला भारतीय क्रिकेटचा आगामी मोठा हिटर मानले जात आहे.
10. सलिल अरोरा (पंजाब किंग्स)
पार्श्वभूमी व कामगिरी: पंजाब किंग्जकडून खेळताना या युवा यष्टीरक्षक-फलंदाजाने मिळालेल्या संधींचे सोने केले. खालच्या फळीत येऊन वेगवान धावा करणे आणि यष्टींमागे चपळ कामगिरी केल्यामुळे त्याचे नावही या हंगामातील टॉप 10 युवा स्टार्सच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
