लंडन : वेगाचा राजा अशी ओळख मिळवलेल्या युसेन बोल्टच्या कारकीर्दीची आज वेदनादायी अखेर झाली. लंडनच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्ट फोर बाय हंड्रेड मीटर्स रिले या शर्यतीची फायनल पूर्णही करू शकला नाही.
बोल्टच्या डाव्या मांडीचा स्नायू अचानक दुखावल्यानं, तो रिले शर्यतीच्या अखेरच्या लॅपमध्ये कळवळून खाली कोसळला. त्यामुळं जमैकाच्या चौकडीला या शर्यतीतून पदकाविनाच माघारी परतावं लागलं.
बोल्टनं योहान ब्लेककडून बॅटन स्वीकारून अखेरच्या लॅपमध्ये मुसुंडी मारली होती. पण डाव्या मांडीतल्या असह्य वेदनांमुळं तो काही क्षणातच कळवळून ट्रॅकवर कोसळला.
लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममधलं ते दृश्य जगभरच्या अॅथलेटिक्स चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं. वेदनांनी कळवळणारा बोल्ट काही क्षण ट्रॅकवरच पडून होता. मग योहान ब्लेक, ज्युलियन फोर्टे आणि ओमार मॅकलोड या सहकाऱ्यांनी जाऊन त्याला सावरलं. त्यामुळं बोल्टला 100 मीटर्स शर्यतीतल्या ब्राँझपदकानंच जागतिक अॅथलेटिक्सचा निरोप घ्यावा लागला.