न्यूयॉर्क : जपानच्या 22 वर्षीय नाओमी ओसाकानं दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदाचा मान पटकावला आहे. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये ओसाकानं बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला हरवलं. पहिल्या सेटमध्ये मोठ्या फरकाने हरल्यानंतर देखील ओसाकानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत सगल दोन सेट जिंकले. आर्थर अॅश स्टेडियमवर विजेतेपदासाठीच्या लढतीत ओसाकानं अजारेंकाला 1-6, 6-3, 6-3 असा फरकानं हरवलं.


22 वर्षीय ओसाकाचं हे तिसरं ग्रँडस्लॅम पदक आहे. याआधी तिनं 2018मध्ये अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचं पदक आपल्या नावं केलं होतं. तर व्हिक्टोरिया अझारेन्काला तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनमध्ये फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा. याआधी 2012 आणि 2013 च्या यूएस ओपनमध्ये तिनं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण दोन्ही वेळा तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. दोन्ही वेळा तिला सेरेना विल्यम्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र तिनं सेरेना विल्यम्सविरुद्ध उपांत्य सामन्यात विजय मिळवला होता.


ओसाकानं 2018 साली यूएस ओपनच्याच कोर्टवर सेरेनाला हरवून ग्रँड स्लॅम किताब जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ओसाकाचं ते पहिलंवहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून वर्ल्ड नंबर होण्याचा मान मिळवला होता. त्याच ओसाकानं पुन्हा एकदा अमेरिकन ओपनवर आपलं नाव कोरलं आहे. अझारेन्काच्या तुलनेत ओसाकाला यंदाच्या यूएस ओपनमध्ये सोपा ड्रॉ मिळाला. त्यामुळे अंतिम फेरीपर्यंत तिला फार मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला नाही. अझारेन्का आणि ओसाका आजवर पाचवेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यापैकी तीन वेळा ओसाकानं तर एकदा अझारेन्कानं बाजी मारली होती. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.