Krishna Nagar : पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरनं (Krishna Nagar) इतिहास रचला आहे. कृष्णानं भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक आणलं आहे. आज सकाळी सुहास यथिराजनं रौप्यपदकं भारताच्या खात्यात मिळवून दिल्यानंतर कृष्णानं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्यानं हॉन्गकॉन्गच्या चू मान कायचा 2-1 असा पराभव केला.
पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरनं पहिला सेट 21-17 असा जिंकला. तर हॉन्गकॉन्गच्या चू मान कायनं दुसरा सेट जिंकत वापसी केली. शेवटचा तिसरा सेट जिंकत कृष्णानं भारताला पाचवं सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचला आहे. कृष्णानं काल झालेल्या सेमीफायनलमध्ये त्यानं ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.
त्याआधी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj ) इतिहास रचला. त्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असलेल्या सुहासनं आज बॅडमिंटन पुरुष एकेरीत SL4 प्रकारात हे पदक जिंकलं. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या के एल माजुरनं त्याचा 21-15, 17-21, 15-21 असा पराभव केला. पराभव जरी झाला असला तरी सुहासनं भारताला पदक मिळवून दिलं आहे. नोएडाचा डीएम असलेला सुहास एल यथिराजनं आजच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार करुन दिली आहे. काल खेळलेल्या सेमीफायनल सामन्यात सुहासनं सोपा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानं डोनेशिया चे फ्रेडी सेतियावानला 31 मिनिटामध्ये सरळ सेटमध्ये 2-0 असं पराभूत केलं होतं. पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 असा जिंकत सुहासनं फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये त्याला निराशा हाती लागली.
Tokyo Paralympics : पॅरालिम्पिक समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखराकडे
ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा हिला
पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोह सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. या समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा हिला (Avani Lekhra) मिळाला आहे. 19 वर्षीय पॅरालिम्पिक शूटर अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एयर रायफल एसएच 1 या स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच नंतर एका कांस्य पदकावरही नाव कोरलं होतं. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी अवनी लेखरा ही पहिलीच खेळाडू आहे.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताकडे आता एकूण 19 पदके आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.