Tilak Varma : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दोन गडी राखून विजय मिळवला. काल (25 जानेवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य होते, जे शेवटच्या षटकात पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 मालिकेतील तिसरा सामना 28 जानेवारी (मंगळवार) रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.






तिलक वर्माच्या झुंजार खेळीने सामना पालटला


हा सामना भारतीय संघासाठी अजिबात सोपा नव्हता. कोलकाता टी-20 मध्ये भारतीय संघाने विकेटचा सहज पाठलाग केला होता, पण चेपॉकमधील परिस्थिती वेगळी होती. भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. एके काळी भारतीय संघाच्या 5 विकेट 78 धावांवर पडल्या होत्या, अशा स्थितीत खेळ हातातून निसटल्याचे दिसत होते, पण तिलकचा इरादा स्पष्ट होता.  या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' तिलकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरवला. तिलक वर्माने 55 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 72 धावा केल्या. 


मागील चार सामन्यांपासून तिलक नाबाद


कालच्या सामन्यात तिलक वर्माने नाबाद 72 धावा करताना एक अनोखा योगायोग झाला. त्याच्या जर्सीचा सुद्धा नंबर 72 आहे. हा योगायोग साधला असतानाच मागील चार डावात तिलक वर्मा नाबाद असून त्याने 338 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्येही त्याने नाबाद 19 धावांची खेळी  केली होती. साऊथ आफ्रिका दौऱ्यातही त्याने सलग दोन नाबाद शतके ठोकली होती.  दरम्यान, तिलक वर्माने कालच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत सहाव्या विकेटसाठी 38 धावांची मॅच टर्निंग पार्टनरशीप केली. मात्र, सुंदर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर अक्षर पटेलही स्वस्तात बाद झाला, त्यामुळे सामना खूपच रोमांचक झाला.






भारताला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 40 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या तीन विकेट्स शिल्लक होत्या. म्हणजे इथे पुन्हा इंग्लंडचा वरचष्मा दिसला. जोफ्रा आर्चरने भारताच्या डावातील 16 वे षटक टाकले, ज्यामध्ये तिलक वर्मा आणि अर्शदीप सिंग यांनी मिळून 19 धावा केल्या. आर्चरच्या त्या षटकात टिळकने दोन षटकार, तर अर्शदीपने एक चौकार लगावला.


बिष्णोईने चांगली साथ दिली


भारताला 24 चेंडूत केवळ 21 धावा करायच्या होत्या. डावातील 17 वे षटक फिरकी गोलंदाज आदिल रशीदने टाकले, ज्यामध्ये त्याने केवळ 1 धाव दिली आणि अर्शदीपची विकेटही घेतली. राशिदच्या त्या शानदार षटकामुळे सामन्यात आणखी एक ट्विस्ट आला. एका बाजूने रवी बिश्नोई मैदानात होता. 18व्या षटकात रवी बिश्नोईने चौकार मारला. ब्रेडन कार्सने टाकलेल्या त्या षटकात एकूण 7 धावा झाल्या. आता भारताला विजयासाठी शेवटच्या दोन षटकांत 13 धावा करायच्या होत्या.


कर्णधार जोस बटलरने अर्धवेळ फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोनला 19 वे षटक दिले. त्या षटकातही सात धावा झाल्या. ज्यामध्ये बिश्नोईच्या बॅटमधून चार तर तिलकच्या बॅटमधून तीन धावा आल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 धावांची गरज होती. जिमी ओव्हरटनच्या त्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टिळकने 2 धावा घेतल्या. त्यानंतर तिलकने पुढच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने 55 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 72 धावा केल्या. रवी बिश्नोई 9 धावांवर नाबाद राहिला आणि त्याने तिलकला निर्णायक साथ दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या