मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी प्रचंड वादळी ठरली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट (बॉल टेम्परिंग) चेंडू अवैधरित्या हाताळताना आढळून आला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्टीव्ह स्मिथला कर्णधार पदावरुन बडतर्फ केलं.


दरम्यान, असं असलं तरीही बॉल टेम्परिंगचे हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.

1. मागील पाच वर्षात द. आफ्रिकेचे काही खेळाडू अशा घटनांमध्ये दोषी आढळून आले होते. ज्यात त्यांच्या कर्णधार डू प्लेसिसचा देखील समावेश आहे. 2016 साली होबार्ट कसोटीदरम्यान, एक चॉकलेट खाऊन त्याच्या लाळेचा वापर त्याने चेंडू चमकवण्यासाठी केला होता. या प्रकरणी आयसीसीकडून त्याच्यावर सामना मानधनातील या शंभर टक्के दंड ठोठावण्यात आला होता.

2. यानंतर वर्षभरानेच द. आफ्रिकेचा फिलांडर हा चेंडूशी छेडछाड करताना आढळून आला होता.

3. 2006 साली पाकिस्तान आणि इंग्लड यांच्यातील सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. या सामन्यात पंच डेरेल हेयर आणि बिली डॉक्ट्र्रोव यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचं म्हणत पाकिस्तानवर पाच धावांची पेनल्टी लावली. दरम्यान, टी ब्रेकनंतर या निर्णयाचा विरोध करत तत्कालीन कर्णधार इंझमाम-उल-हकने मैदानावर येण्यास नकार दिला होता. ज्यानंतर पंचांनी इंग्लंडला विजयी घोषित केलं होतं. यानंतर आयसीसीने पाकिस्तानवर लावण्यात आलेले आरोप मागे घेऊन सामना अनिर्णित ठरवला होता.

4. बॉल टेम्परिंग प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर देखील एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. 2001 साली द. आफ्रिकेविरुद्ध सचिन बॉलची सीम घासत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यावेळी सचिन फक्त चेंडूवरील गवत बाजूला करत होता. या प्रकरणी मॅच रेफ्री माइक डेनिसने सचिनवर एका सामनाची बंदी घातली होती. दरम्यान, आयसीसीने नंतर तेंडुलकरला दोष मुक्त केलं होतं. तसंच तिसऱ्या कसोटीचा टेस्ट दर्जाही रद्द केला. कारण बीसीसीआयने डेनिसला मॅच रेफ्री म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता.

5. 1994 साली इंग्लंडचा कर्णधार माइक एथरटन हा देखील बॉल टेम्परिंगप्रकरणात दोषी आढळला होता. त्याने आपल्या खिशातून काही तरी वस्तू काढत चेंडू घासला होता. दरम्यान, एथरटनने आपल्यावरील आरोप अमान्य केले होते. आपण फक्त हात सुखवण्यासाठी माती हाताला लावत होतो. याप्रकरणी टेम्परिंगचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले नाहीत. पण पंचांना न सांगता अशाप्रकारे धूळ हाताला लावल्याने मॅच रेफ्रीने त्याला दोन हजार युरोचा दंड ठोठावला होता.

संबंधित बातम्या :

मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होणार?

स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई

स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद

स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार