Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका 13 जून रोजी धरमशाला येथे सुरू होणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन सामने 17 जून रोजी लखनौ आणि 20 जून रोजी चेन्नई येथे होणार आहेत.

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका 13 जून रोजी धरमशाला येथे सुरू होणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन सामने 17 जून रोजी लखनौ आणि 20 जून रोजी चेन्नई येथे होणार आहेत.
तो नेहमीच एक मोठा धक्का असतो
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देणारा विराट कोहली अंतिम सामन्यादरम्यान अस्वस्थ दिसत होता. शेवटच्या षटकांमध्ये धावताना त्याला त्रास होत असल्याचे दिसत होते, परंतु त्याने मैदान सोडले नाही आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो परतला. अंतिम सामन्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत कोहलीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. दुखापतीची तीव्रता अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. विराट कोहलीच्या उपलब्धतेबद्दल सुरू असलेल्या अटकळांवर टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाले, "अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल, परंतु विराटसारख्या खेळाडूची अनुपस्थिती नेहमीच एक मोठा धक्का असतो."
आता आयपीएल संपताच चाहत्यांचे लक्ष 13 जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर लागले होते. पण कोहलीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आणि आता माजी कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीनेही भारतीय संघाची चिंता वाढवली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून रोहित शर्मा अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. अशा परिस्थितीत, एकदिवसीय मालिकेत त्याचा सहभाग होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. असे झाल्यास, भारताला आपले दोन सर्वात मोठे मॅच-विनर्स, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मैदानात उतरावे लागू शकते.
रोहितला अद्याप फिटनेसची मंजुरी मिळालेली नाही
रोहित शर्माची निवड फिटनेस मंजुरीवर अवलंबून होती. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना स्पष्टपणे सांगितले होते की, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून फिटनेस मंजुरी मिळाल्यानंतरच रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही संघात सामील होण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, रोहित शर्माला अद्याप ही मंजुरी मिळालेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रोहित अद्याप बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचलेला नाही, ज्यामुळे त्याच्या उपलब्धतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या






















