गॉल : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसरा डाव 245 धावांत गुंडाळून गॉल कसोटीत 304 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह श्रीलंका दौऱ्यातल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


भारताचा 85 वर्षांच्या इतिहासातील परदेशातील हा सर्वात मोठा मोठ्या फरकाने मिळवलेला विजय आहे. यापूर्वी भारताने 1986 साली लीड्स कसोटीत इंग्लंडवर 279 धावांनी मात केली होती.

टीम इंडियाने या विजयासह 2015 सालच्या गॉल कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचीही परतफेड केली. गॉल कसोटीतील 2015 च्या पराभवानंतर आतापर्यंत 24 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी 18 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर 5 सामने अणिर्नित राहिले आणि एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

भारताचा कसोटीतील हा सर्वात मोठा चौथा विजय ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिल्लीत 2015 मध्ये भारताने 337 धावांनी विजय मिळवला होता. 2016 मध्ये इंदूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 321 धावांनी, 2008 मध्ये मोहाली कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 320 धावांनी भारताने विजय मिळवला होता.

परदेशातील भारताचा हा सर्वात मोठा चौथा विजय ठरला. गॉल कसोटी श्रीलंकेविरुद्ध 304 धावांनी, लीड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध 1986 साली 279 धावांनी, कोलंबोत 2015 साली 278 धावांनी आणि ऑकलंडमध्ये 1968 साली भारताने 272 धावांनी मोठा विजय मिळवला होता.