मोहाली : विराट कोहलीच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं मोहालीच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराटच्या नाबाद अर्धशतकामुळे टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं.  विराटनं चेंडूत चौकार आणि षटकारासह धावांची खेळी उभारली. त्याचं  ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं.


आफ्रिकेने दिलेल्या 150 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला रोहित शर्मा (14) आणि शिखर धवनने (40) सावध सुरुवात करून दिली. रिषभ पंत चार धावांवर बाद झाला. शेवटी श्रेयस अय्यर (16) च्या साथीने विराटने विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी,  दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कर्णधार क्विंटन डी कॉक आणि टेंबा बवुमाच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकांत पाच बाद 149 धावांची मजल मारली. डी कॉकनं 37 चेंडूत आठ चौकारांसह 52 धावांची खेळी साकारली. तर बवुमानं तीन चौकार आणि एका षटकारासह 49 धावा फटकावल्या. भारताकडून दीपक चहरनं दोन तर नवदीप सैनी, हार्दिक पंड़्या आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चपळ क्षेत्ररक्षणानं क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. विराटनं या सामन्यात क्विंटन डी कॉकचा घेतलेला झेल थक्क करणारा होता. अर्धशतक झळकावणाऱ्या डी कॉकचा नवदीप सैनीच्या चेंडूवर उडालेला उंच झेल मिड ऑफवर उभ्या विराटनं लिलया टिपला.