नवी दिल्ली : पुढच्या वर्षीपासून सुरु होत असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी सराव सत्राला भारतीय संघ उपस्थित राहणार आहे. नेट प्रॅक्टिससाठी चार नव्या गोलंदाजांचा समावेशही करण्यात आला आहे.
पाच जानेवारीपासून सुरु होत असलेल्या कसोटीपूर्वी कोणताही सराव सामना होणार नाही. त्याऐवजी सराव सत्रावर भर देण्यात येणार असल्याचं भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला कळवलं आहे.
सराव सामना रद्द करण्याचं कोणतंही अधिकृत कारण देण्यात आलेलं नाही. मात्र पाच जानेवारीपासून सुरु होत असलेल्या कसोटीसाठी भारतीय संघ सराव सामन्याशिवायच उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
मोहम्मद सिराज, आवेश खान, नवदीप सैनी आणि बासिल थंपी यांचा नेट गोलंदाज म्हणून समावेश करण्यात येणार, याबाबतची पुष्टी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने 'पीटीआय'शी बोलताना केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या जलद गोलंदाजांचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाजांना सोपं होईल, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन असे संघ आहेत, जे पाहुण्या संघाला सरावासाठी जलद गोलंदाज देत नाहीत. त्यामुळे पाहुण्या संघाला आपल्या देशातूनच नेट गोलंदाज सोबत न्यावे लागतात.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, रिद्धीमान साहा, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या
कसोटी मालिका वेळापत्रक : भारत आणि द. आफ्रिकेमध्ये 5 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान तीन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.
पहिली कसोटी - 5 ते 9 जानेवारी (केप टाऊन)
दुसरी कसोटी - 13 ते 17 जानेवारी (सेंच्युरियन)
तिसरी कसोटी - 24 ते 28 जानेवारी (जोहान्सबर्ग)
यानंतर वनडे आणि टी-20 मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र सध्या कसोटी संघाचीच निवड करण्यात आली आहे.