मुंबई : मॉर्ने मॉर्कल... वरनॉन फिलॅण्डर... कागिसो रबादा... अँडिल फेलुकवायो... ख्रिस मॉरिस... आणि डेल स्टेन... हा आहे दक्षिण आफ्रिकेचा तोफखाना. एकदोन नाही, तर तब्बल अर्धा डझन तोफा चौदाजणांच्या दक्षिण आफ्रिकी फौजेच्या दिमतीला आहेत. त्यातली एखादी तोफ जरी निकामी ठरली, तरी दुसरी तोफ ही पहिलीपेक्षा दुपटीने आग ओकणारी आहे.


प्रतिस्पर्धी फलंदाजीची तटबंदी कितीही भक्कम असली तरी दक्षिण आफ्रिकेतल्या वेगवान आणि बाऊन्सी रणमैदानांवर या तोफांची परिणामकारकता कमालीची आहे. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे.

विराट कोहलीची टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकी वातावरणात दक्षिण आफ्रिकी वादळाच्या त्याच आव्हानाला सामोरी जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई उद्यापासून केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली तीन कसोटी सामन्यांची मालिका ही दोन बलाढ्य फौजांमधल्या युद्धाइतकीच तुंबळपणे लढली जाईल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्यातलं द्वंद्व हे या युद्धाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला वेगवान आक्रमणानेच उत्तर देण्याचा टीम इंडियाचा मनसुबा आहे. त्यासाठी भारतीय फौजेत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या अशा वेगवान अस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला थोपवण्यासाठी आणि प्रसंगी त्यावर हल्ला चढवण्यासाठी भारतीय फौजेत शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिद्धिमान साहा अशी फलंदाजांची फळी मौजूद आहे.

विराट कोहलीची टीम इंडिया हा कदाचित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झालेला भारताचा सर्वात बलाढ्य आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला संघ ठरावा. विराट सेनेचा अश्वमेध सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. टीम इंडियाने त्या नऊपैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली आहे. पण भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे. विराट कोहलीला त्याची नेमकी कल्पना आहे.

भारतीय संघाला गेल्या पंचवीस वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. किंबहुना भारताने दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे. या सहा कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर सतरा कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी दोन कसोटी सामने भारतानं जिंकले आहेत. एक राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि दुसरा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली.

भारतीय क्रिकेटरसिकांना आताच्या दौऱ्यात विराट सेनेकडून केवळ एका कसोटी विजयाची नाही, तर पहिल्या कसोटी मालिका विजयाची अपेक्षा आहे. विराट सेनेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ती किमया करून दाखवली, तर तो नवा इतिहास ठरेल.