पुणे : पाकिस्तानला सलग आठव्यांदा चारीमुंड्या चित केल्यानंतर टीम इंडिया (Team India) पुढील सामना खेळण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाली आहे. पुण्यामध्ये त्यांचं विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळाडूला जाणार आहे. बऱ्याच कालखंडानंतर पुण्यात सामना होत असल्याने सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


दुसरीकडे, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा अजिंक्य रथ सुरूच आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 30.3 षटकात 7 विकेट्स राखून सामना जिंकला.विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. प्रत्येक वेळी भारतीय संघ जिंकला आहे. म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध एकही सामना जिंकू शकलेला नाही. यावेळी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली विजयाची काहीशी आशा होती, पण संघाची स्थिती अपेक्षेपेक्षा विरुद्ध होती.

 

अहमदाबाद सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि 42.5 षटकात 191 धावांवर आटोपला. संघाची सुरुवात चांगली झाली होती. पाकिस्तानने 29 षटकांत 2 बाद 150 धावा केल्या होत्या. येथून संघ तीनशेहून अधिक धावा करू शकेल असे वाटत होते.

 

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली होती. मात्र दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संपूर्ण संघ 191 धावांवर गडगडला. बाबरने 50 धावांची तर रिझवानने 49 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानने केवळ 36 धावा (155/2 - 191/10) मध्ये आपले शेवटचे 8 विकेट गमावले. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारतीय संघासमोर सामना जिंकण्यासाठी 192 धावांचे सोपे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात त्यांनी अवघ्या 30.3 षटकांत 3 गडी गमावून सामना जिंकला. संघाकडून कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. यादरम्यान त्याने 6 षटकार आणि 6 चौकार लगावले. रोहितने गेल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावांची शतकी खेळी केली होती. म्हणजेच रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

 

रोहितशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद 53, केएल राहुलने नाबाद 19, शुभमन गिलने 16 आणि विराट कोहलीने 16 धावा केल्या. पाकिस्तानसाठी कोणताही गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकला नाही. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने 2 आणि हसन अलीने 1 बळी घेतला.

 

इतर महत्वाच्या बातम्या