Rohit Sharma : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज (23 फेब्रुवारी) भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघ प्रथम फलंदाजी करत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. सलग 12व्यांदा रोहित शर्माने नाणेफेक गमावली आहे. रोहितने शेवटची नाणेफेक 15 नोव्हेंबर 2023 रोजी जिंकली होती. त्यानंतर आजपर्यंत रोहितला नाणेफेक जिंकता आलेली नाही.
पाकिस्तानी संघात एक बदल करण्यात आला
दरम्यान, पाकिस्तानी संघात एक बदल करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर फखर जमानला दुखापत झाली होती. यामुळे फखर स्पर्धेतून बाहेर पडला. फखरच्या जागी सलामीवीर इमाम उल हक या सामन्यात खेळत आहे. भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. जो संघ बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळायला आला होता तोच संघ या सामन्यात खेळत आहे.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 विकेटने पराभव केला होता. तर पाकिस्तानी संघाला सुरुवातीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. हा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छित आहे. तसं पाहिलं तर भारतीय संघाचा दुबईत पाकिस्तानविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट आहे. आशिया कप 2018 मध्ये भारतीय संघ दोन वेळा पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला, दोन्ही वेळा जिंकला. याआधी 2018 च्या आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाचा 9 विकेटने पराभव केला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान पाच वेळा आमनेसामने आले आहेत, जिथे पाकिस्तानने भारतीय संघाला तीन वेळा पराभूत करून आघाडी घेतली आहे. पाकिस्तानी संघाने 2004 मध्ये इंग्लंडमध्ये, 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि 2017 मध्ये लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या फायनलमध्ये विजय मिळवला होता. दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 135 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 57 वेळा तर पाकिस्तानने 73 वेळा बाजी मारली. 5 सामन्यांचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व 8 संघ आपापल्या गटात 3-3 सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जर एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण 5 सामने खेळेल.
इतर महत्वाच्या बातम्या