लंडन: बांगलादेशचा धडाकेबाज सलामीवीर तमीम इकबालने एसेक्स कौंटी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


तमीम इकबालने आपल्यावर कथित अॅसिड हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आपण कौंटी क्लब सोडत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

एसेक्स कौंटी क्लबकडून खेळणाऱ्या तमीमने टी 20 ब्लास्ट कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच सामन्यात सहभाग घेतला होता.

काय आहे प्रकरण?

बांगलादेशमधील दैनिक 'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, पत्नी आयशा आणि एका वर्षाच्या मुलीसोबत तमीम एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. आयशाने हिजाब परिधान केला होता. हे तिघे हॉटेलमधून बाहेर येताच, काही संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. इतकंच नाही तर त्यांनी तमीमसह त्याच्या कुटुंबावर अॅसिड फेकलं. मात्र सुदैवाने ते अॅसिड  त्यांच्या शरिरापर्यंत न पोहोचल्याने त्यांना इजा झाली नाही.

सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेला रामराम

या घटनेमुळे धक्का बसलेल्या तमीम इकबालने थेट स्पर्धेलाच रामराम केला आहे.तमीम हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

तमीमने ब्लास्ट कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स कौंटी क्लबकडून एकच टी 20  सामना खेळला होता. रविवारी झालेल्या या सामन्यात, त्यांना सात विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.