मुंबई : अखेर रिओ ऑलिम्पिकच्या 74 किलो वजनी गटात महाराष्ट्राचा नरसिंग यादवच भारताचं प्रतिनिधित्व करेल, यावर दिल्ली उच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे कुस्तीपटू सुशील कुमार याचे रिओ ऑलिम्पिकसाठीचे स्वप्न भंगले आहे.
वास्तविक, गेल्या वर्षी लास वेगासमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत नरसिंग यादवनं कांस्य पदकाची कमाई करून रिओ ऑलिम्पिकसाठीचा कोटा मिळवला होता. त्यामुळं भारतीय कुस्ती फेडरेशननंही नरसिंगलाच रिओ ऑलिम्पिकला पाठवण्याचा निर्णय घेतला.
पण, भारताचा डबल ऑलिम्पिक विजेता पैलवान सुशीलकुमारला हा निर्णय रुचला नाही. त्यानं आणि त्याच्या समर्थकांनी भारतीय कुस्ती फेडरेशनच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
रिओ ऑलिम्पिकच्या 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व कुणी करावं या निर्णयासाठी आपली आणि नरसिंगची चाचणी कुस्ती खेळण्याची मागणी केली होती. पण दिल्ली उच्च न्यायालयानं दहा दिवस सुरू असलेल्या सुनावणीनंतर सुशीलकुमारची मागणी फेटाळली आहे.