मुंबई/चेन्नई: करूण नायर कसोटी क्रिकेटमधला भारताचा दुसरा त्रिशतकवीर ठरला आहे.

वीरेंद्र सहवागनं 2004 साली मुलतानच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध आणि मग 2008 साली चेन्नईच्या रणांगणात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीनशे धावांची वेस ओलाडंली होती. त्यानंतर आठ वर्षांनी आणखी एका भारतीय फलंदाजानं सहवागचा कित्ता गिरवला. त्या महापराक्रमी फलंदाजाचं नाव करुण कलाधरन नायर.

करुणनं वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हा पराक्रम गाजवला. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाजही ठरला.

करुण नायरच्या त्रिशतकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कारकीर्दीतल्या पहिल्या कसोटी शतकाचं त्रिशतकात रुपांतर करणारा तो जगातला तिसरा फलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सनं 1958 साली आणि ऑस्ट्रेलियाच्या बॉबी सिम्पसन यांनी 1964 साली हा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल 52 वर्षांनी भारताच्या करुण नायरनं पहिल्या कसोटी शतकाचं त्रिशतकात रुपांतर करण्याचा योग जुळवून आणला.

करुण नायरनं इंग्लंडच्या आदिल रशिदचा चेंडू सीमापार धाडून आपल्या पहिल्यावहिल्या त्रिशतकाला गवसणी घातली.

करुणच्या 381 चेंडूंमधल्या नाबाद 303 धावांच्या खेळीला 32 चौकार आणि चार षटकारांचा साज होता. या खेळीदरम्यान त्याचा  स्ट्राईक रेट हा 79.52 असा जबरदस्त होता.

वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल

चेन्नई कसोटीत सलामीच्या लोकेश राहुलचं द्विशतक अवघ्या एका धावेनं हुकलं, पण करुणनं कमाल केली. त्यानं कारकीर्दीतल्या तिसऱ्याच कसोटीत थेट त्रिशतक  झळकावलं. इतकंच काय, पण करूणनं तीन-तीन मोठ्या भागीदारीही रचल्या. राहुलच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 161 धावांची, अश्विनच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 181 धावांची आणि मग रवींद्र जाडेजाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 138 धावांची. त्यामुळंच भारतानं सात बाद 759 हा कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम स्कोर उभारता आला.

कर्नाटकचा हा युवा फलंदाज आज भारतीय क्रिकेटचा नवा नायक बनला आहे. पण पाच महिन्यांआधी याच करुण नायरला साक्षात मृत्यूशी दोन हात करण्याची वेळ आली होती.

करूण मूळचा केरळचा आहे. 17 जुलैला तो आपल्या गावच्या उत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी नदी पार करून मंदिरात जाताना, करूणची नौका उलटली होती. पोहता येत नसल्यानं करूण बुडू लागला होता. पण तटरक्षक दलाच्या दक्ष जवानांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं.

करुण नायरच्या अपघाताची ती कहाणी ऐकली की आजही जीवाचा थरकाप उडतो. त्यामुळं करुण नायरचं  त्रिशतक कुणाला समर्पित करायचं, त्याचा जीव वाचवणाऱ्या तटरक्षक दलाच्या जवानांचा पर्याय पहिला असू शकतो.

संबंधित बातम्या :

मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर

चेन्नईत ‘करुण’सह भारतानंही रचला विक्रम…

करुणचं त्रिशतक, सेहवागचं हटके ट्विट

इंग्लंडविरुद्ध करुण नायरचं त्रिशतक, भारताकडे 270 धावांची आघाडी

वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल