मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघातील मराठी मुलगी स्मृती मानधनाने आयसीसीच्या वन डेतील महिला फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच ही पहिलीच वेळ आहे की भारतीय महिला आणि पुरुष संघाचे खेळाडू एकाचवेळी अव्वल स्थानी आहेत.
स्मृतीने ऑस्ट्रलियाच्या एलिस पॅरी आणि मेग रॅनिंग्जला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. स्मृतीचे आयसीसी क्रमावारीत 751 अंक आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या एलिस पॅरीचे 681 अंक आहेत.
स्मृतीव्यतिरिक्त भारतीय एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज आयसीसी क्रमवारीत टॉप-10 मध्ये आहे. मिताली राज सध्याच्या क्रमावारी 669 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे. आयसीसीने स्मृतीचा 2018 वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणूनी गौरव केला आहे.
स्मृतीने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दमदार प्रदर्शन केलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मृतीने 105 धावांची धमाकेदार खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यातली 90 धावांचा नाबाद खेळी केली होती. स्मृतीच्या या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ही मालिका 2-1 ने जिंकली.