Smriti Mandhana: टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलं आहे. स्मृतीने स्वत: माहिती देत याबाबत घोषणा केली आहे. स्मृतीने पोस्ट करत म्हटलं आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी. पलाश मुच्छलनेही पोस्ट केली आहे.
आता पुढे जाण्याची वेळ आली आहे
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपदं जिंकणं हेच आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.
पलाश मुच्छलने सुद्धा लग्न मोडल्याची माहिती दिली
दरम्यान, स्मृतीने इन्स्टा स्टोरीवरून लग्न मोडल्याची माहिती दिल्यानंतर पलाश मुच्छलने सुद्धा इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लग्न रद्द केल्याची माहिती दिली आहे. पलश मुच्छलने म्हटलं आहे की, मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन.
माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे
आपण समाज म्हणून, कोणाच्याही बदनामीच्या अफवा किंवा न पडताळलेल्या गोष्टी ऐकून त्याचा न्याय करण्याआधी थोडा थांबायला शिकलं पाहिजे, अशी खरी इच्छा आहे. आपले शब्द कोणाला किती खोल जखम करू शकतात, हे आपल्याला कधी कधी समजतही नाही. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असतानाच, जगात अजून अनेक लोक मोठ्या अडचणींना सामोरं जात आहेत. खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात ज्यांनी माझ्या सोबत उभं राहून माझ्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवली, त्या सर्वांचे मनापासून आभार.
लग्नाच्या आदल्या रात्री काय घडलं?
लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत सर्वकाही सांगलीत धुमधडाक्यात लग्न सुरु होतं. यादरम्यान, स्मृतींच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे वडील रुग्णालयात दाखल होताच स्मृतीने कोणताही विचार न करता विवाहसोहळा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावाच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झाला. दोन कुटुंबांवर आलेल्या या दुहेरी संकटाने लग्न केवळ स्थगितच नव्हे, तर अनिश्चिततेच्या दरीत कोसळले. त्यानंतर स्मृतीने लग्नातील मेहंदी-संगीताचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या