न्यूयॉर्क : अमेरिकेची बिगरमानांकित स्लोआन स्टीफन्स अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली आहे. स्लोआन स्टीफन्सने अमेरिकेच्याच मॅडिसन कीजचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडवून, महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
स्लोआन स्टीफन्सच्या कारकीर्दीतलं हे पहिलं-वहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. विशेष म्हणजे अमेरिकन ओपनच्या इतिहासात विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती गेल्या आठ वर्षांमधली पहिली बिगरमानांकित खेळाडू ठरली.
याआधी 2009 साली किम क्लायस्टर्सनं अमेरिकन ओपन जिंकून, व्यावसायिक टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केलं होतं. स्लोआन स्टीफन्सनं यंदा बिगरमानांकित खेळाडू म्हणून अमेरिकन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवलाच, पण ग्रँड स्लॅमच्या इतिहासातही विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती केवळ पाचवी बिगरमानांकित खेळाडू ठरली.
स्लोआन स्टीफन्सच्या कामगिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिनं डाव्या तळपायाच्या दुखापतीतून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्याचा पराक्रम गाजवला. या दुखापतीमुळं स्लोआनला एक-दोन नाही, तर तब्बल 11 महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. त्या दुखापतीतून सावरलेल्या स्लोआननं जुलै महिन्यातच व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यामुळं ती अमेरिकन ओपन जिंकेल, असं भाकित पंधरा दिवसांआधी कुणी केलं असतं तर लोकांनी त्यांना मूर्खात काढलं असतं. पण स्लोआननं कमाल केली. तिनं अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर केवळ आपलं नाव कोरलं नाही, तर महिला एकेरीच्या फायनलवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
स्लोआन स्टीफन्सच्या या यशाचं गमक तिच्या जन्मजात अॅथलेटिसिझ्मला आणि प्रामुख्यानं तिच्या आई सिबिल स्मिथना जातं. अमेरिकेचे व्यावसायिक फुटबॉलवीर जॉन स्टीफन्स आणि जलतरणपटू सिबिल स्मिथ यांची स्लोआन ही लेक. लहानपणापासूनच स्लोआनचा सांभाळ तिच्या आईनंच केला. कारण आधी जॉन स्टीफन्स यांचं अपघाती निधन झालं आणि मग त्यांचा दुसरा पतीही कर्करोगानं वारला. पण सिबिल स्मिथ यांनी आपल्या लेकीची आबाळ होऊ दिली नाही. त्यांनी स्लोआनला वयाच्या नवव्या वर्षीच टेनिसची गोडी लावली. स्लोआन अकरा वर्षांची असताना त्यांनी तिला अॅकॅडमीत दाखल केलं होतं. आपल्या जन्मदात्रीच्या त्याच उपकारांची जाण ठेवून स्लोआननं त्यांना यशाचं श्रेय दिलं.
स्लोआन स्टीफन्सनं वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवून आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली आहे. पण सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनींनी वयाची ओलांडलेली पस्तिशी लक्षात घेता स्लोआन स्टीफन्सकडून महिला टेनिसला आणखी मोठी अपेक्षा राहिल.
स्लोआन स्टीफन्स : नवी ग्रँड स्लॅम चॅम्पियन
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 Sep 2017 07:20 PM (IST)
स्लोआन स्टीफन्सच्या कारकीर्दीतलं हे पहिलं-वहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. विशेष म्हणजे अमेरिकन ओपनच्या इतिहासात विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती गेल्या आठ वर्षांमधली पहिली बिगरमानांकित खेळाडू ठरली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -