Shubman Gill : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला. कॅप्टन रोहित शर्माचा संघात समावेश नसून त्याच्या जागी संघाची कमान जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली. या सामन्यातून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून कसोटीमध्ये धावांसाठी झगडत आहे. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला संघात संधी देण्यात आली. आकाशदीपला संघाबाहेर ठेवून भारताने आणखी एक बदल केला असून त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली.


शुभमन गिल अवघ्या 20 धावा करून बाद झाला


पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या तीन विकेट्स 57 धावांवर होती. विराट कोहली 12 धावा करून नाबाद राहिला. यशस्वी जैस्वालने 10 धावांवर आपली विकेट गमावली, तर केएल राहुल केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माच्या जागी संघात आलेला गिल 20 धावा करून बाद झाला. भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा डळमळीत झाल्याचे दिसून आले. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्यावर सलामीची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र दोघेही मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले.






गिलवर शाब्दिक डावपेच टाकून एकाग्रता भंग 


संधी मिळालेल्या गिलला मोठी खेळी करून विश्वास निर्माण करण्याची संधी होती, पण गिल कांगारूंच्या शाब्दिक डावपेचांमध्ये अडकल्याचे दिसून आले. खेळ थांबण्यासाठी अवघा एक चेंडू बाकी असताना नाथन लायनच्या गोलंदाजीवर गिल बाद झाला. मात्र, गिल बाद होण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथकडून शाब्दिक टिप्पणी सुरु होती. तेव्हा गिलने सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाचवेळी स्मिथ आणि लॅबुशेनकडून टिप्पणी सुरु होती आणि यामध्येच गिल अडकला आणि लायनच्या  चेंडूवर बाद झाला. त्यामुळे एकाग्रता भंग करण्यात कांगारू पटाईत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली.    


या मैदानावर भारताने 47 वर्षात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही


दरम्यान, दुखापतीमुळे आकाशदीप या सामन्यात खेळत नाही, तर रोहित शर्माने स्वत:ला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर गेल्या 47 वर्षांत भारताने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या मैदानावर भारताचा शेवटचा विजय 1978 मध्ये झाला होता. 2012 मध्ये भारताला सिडनीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर 2012 नंतर झालेल्या सामन्यांमध्ये भारताने येथे तीन कसोटी अनिर्णित ठेवल्या आहेत. हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र, आता जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा विक्रम मोडीत काढू शकतो की नाही हे पाहायचे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या