वांडरर्स, द. आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सहा सामन्याच्या मालिकेत द. आफ्रिकेचं आव्हान अद्यापही कायम आहे. दरम्यान, या सामन्यात शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने पराभवाबद्दल बोलताना दोन महत्त्वाची कारणं सांगितली.
या सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना बराच वेळ थांबवावा लागला. तर त्याच वेळी डेव्हिड मिलरला दोनदा जीवदान देणंही भारताला चांगलंच महागात पडलं.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 289 धावा केल्या होत्या. दरम्यान, द. आफ्रिकेचा डाव सुरु असताना 8व्या षटकात पावासाने हजेरी लावली. त्यामुळे या सामन्याचा संपूर्ण नूरच पालटला. जेव्हा पाऊस थांबला त्यांनतर आफ्रिकेला 28 षटकात 202 धावांचं नवं लक्ष्य देण्यात आलं.
त्यानंतरही भारतीय संघाने चांगली गोलंदाजी करत द. आफ्रिकेच्या खेळाडूंना जखडून ठेवलं होतं. त्याचवेळी 18 व्या षटकात मिलरला एकदा नव्हे तर दोनदा जीवदान मिळालं. एकदा त्याचा झेल सुटला तर दुसऱ्यांदा यजुवेंद्र चहलने त्याला 'नो बॉल'वर बोल्ड केलं. त्यावेळी तो फक्त सात धावांवर होता. या जीवदानाचा त्यानेही पुरेपूर फायदा उठवला आणि 28 चेंडूत 39 धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना धवन म्हणाला की, 'पराभवाचं मुख्य कारण म्हणजे झेल सोडणं तर होतंच पण त्याचवेळी नो बॉलवर विकेट न मिळणं हेही एक कारण होतं. त्यानंतर सामन्याची लयच बदलली. नाहीतर आम्ही खूप चांगल्या स्थितीत होतो.'
'पावसामुळे गोलंदाजी करताना बराच फरक पडला. चेंडू सारखा ओला होत असल्याने आमच्या फिरकी गोलंदाजांना चेंडू फार वळवता येत नव्हता. त्यामुळे आमची गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही. त्याचच फायदा द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी घेतला.' असंही धवन म्हणाला.
SAvsIND: 'ती' एक चूक फार महागात पडली : शिखर धवन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Feb 2018 04:15 PM (IST)
18 व्या षटकात मिलरला एकदा नव्हे तर दोनदा जीवदान मिळालं. एकदा त्याचा झेल सुटला तर दुसऱ्यांदा यजुवेंद्र चहलने त्याला 'नो बॉल'वर बोल्ड केलं. त्यावेळी तो फक्त सात धावांवर होता. या जीवदानाचा त्यानेही पुरेपूर फायदा उठवला आणि 28 चेंडूत 39 धावा केल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -