नवी दिल्ली: जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकविजेती धावपटू हिमा दासचे प्रशिक्षक निपॉन दास यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. गुवाहाटीतील एका महिला धावपटूनं हे आरोप केले आहेत. पण दास यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराज्य विजेतेपद स्पर्धेत संघात जागा न दिल्यानं या महिला धावपटूनं आपल्यावर असे आरोप केले आहेत, असं दास यांनी म्हटलं आहे.

निपॉन दास यांच्या मार्गदर्शनाखाली आसामच्या हिमा दासनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीचं सुवर्ण जिंकून इतिहास घडवला होता.

मात्र आता दुसऱ्या एका खेळाडूने प्रशिक्षक निपॉन दास यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तक्रार करणारी खेळाडूही 20 वर्षाची आहे. निपॉन दास यांनी लैंगिक शोषण केलंच, शिवाय धमकीही दिली, असा आरोप तक्रारदार खेळाडूने केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे आसामचे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त आणि सचिव आशुतोष अग्निहोत्री यांनी, प्रशिक्षकांवर आरोप झाल्याची पुष्टी केली आहे.

“सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. प्रशिक्षकाने मे महिन्यात लैंगिक शोषण झाल्याचं तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं  आहे”, असं अग्निहोत्री यांनी सांगितलं.

दरम्यान, आपण तक्रारदार खेळाडूला प्रशिक्षण दिल्याचं निपॉन दास यांनी म्हटलं आहे. मात्र संघनिवडीदरम्यान आपलीच निवड व्हावी यासाठी ती दबाव टाकत होती. तिची निवड न केल्याने तिने हा आरोप केला आहे, असं निपॉन दास यांनी म्हटलं आहे.

"महिला धावपटू 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीसाठी माझ्याकडून प्रशिक्षण घेत होती. आसाम संघात निवडीसाठी ती माझ्यावर दबाव टाकत होती. मी तसं करु शकत नव्हतो कारण इतर खेळाडू तिच्यापेक्षा सरस होते. तिला राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये जागा मिळाली नाही. म्हणून तिने माझ्यावर खोटे आरोप केले. याबाबत तिला काही पुरावेही देता आले नाहीत", असं निपॉन यांनी सांगितलं.

भारतीय धावपटू हिमा दासचा जागतिक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम 

भारताची धावपटू हिमा दासने 'सुवर्ण'मयी विक्रमाला गवसणी घातली. फिनलंडमध्ये झालेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला. हिमाने महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली.