अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं हाताच्या दुखापतीमुळं फ्रेन्च ओपनमधून माघार घेतली आहे. महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत सेरेनाचा सामना रशियाच्या मारिया शारापोव्हाशी होणार होता. या सामन्याविषयी टेनिसरसिकांमध्येही कमालीची उत्सुकता होती. पण या सामन्याआधीच सेरेनाला फ्रेन्च ओपनमधून माघार घेण्याची वेळ आली.


ती आली... ती नेटानं खेळली... पण उजव्या दंडाच्या दुखापतीसमोर तिचा नाईलाज झाला.

सेरेना विल्यम्सला आपली मोहीम अर्ध्यावरच सोडून फ्रेन्च ओपनमधून माघार घ्यावी लागली. पण सेरेना विल्यम्सनं एक स्त्री म्हणून आपल्या समोरच्या आव्हानांना सामोरं जाण्याची दाखवलेली जिद्द लक्षात घेतली, तर फ्रेन्च ओपनमधून माघार घेऊनही तिला चॅम्पियनच म्हणावं लागेल.

ग्रँड स्लॅमच्या टेनिसच्या दुनियेत आजवर तब्बल 23 विजेतीपदांची कमाई करणारी सेरेना विल्यम्स ही आजच्या जमान्याची चॅम्पियन आहेच, पण फ्रेन्च ओपनमधल्या निव्वळ सहभागानंही तिला वन ऑफ द ग्रेटेस्ट चॅम्पियन ठरवलं आहे.

सेरेना विल्यम्सनं २८ जानेवारी २०१७ रोजी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, त्या वेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. दस्तुरखुद्द सेरेनानं एप्रिल महिन्यात हा गौप्यस्फोट केला त्या वेळी तुम्ही आम्ही अक्षरश: तोंडात बोटं घातली होती.

त्यानंतर सेरेनानं एक सप्टेंबर २०१७ रोजी आपल्या लेकीला म्हणजे अॅलेक्सिस ऑलिम्पियाला जन्म दिला. त्या वेळी कुणी स्वप्नातही विचार केला नसावा की, ही वीरांगना अवघ्या साडेआठ महिन्यांमध्ये पुन्हा ग्रँड स्लॅमच्या कोर्टवर सर्वोच्च दर्जाचं टेनिस खेळताना दिसेल. सेरेनानं रोलँड गॅरोसवरच्या फ्रेन्च ओपनमध्ये तो चमत्कार घडवला.

सेरेनानं हा चमत्कार घडवला त्यावेळी वय तिच्या बाजूनं नव्हतं. येत्या चार महिन्यांमध्ये ती ३७ वर्षांची होणार आहे. एक ३६ वर्षांची स्त्री पहिल्या बाळंतपणानंतर केवळ साडेआठ महिन्यांमध्येच सर्वोच्च दर्जाचं टेनिस खेळू शकते, हा तिच्या सुपर फिटनेसचा अविष्कार होता. त्या सुपरफिट सेरेनानं मग सव्वीस वर्षांची क्रिस्टिना प्लिस्कोवा, बावीस वर्षांची अॅशली बार्टी आणि एकोणतीस वर्षांची ज्युलिया जॉर्जेस यांना एकापाठोपाठ एक गारद केलं.

सेरेनाच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे, हे कितीही खरं असलं तरी वय आणि फिटनेस कुणालाही दडवता येत नसतो. सेरेनानं पहिल्या तीन राऊंड्समध्ये आपल्यापेक्षा तरुण आणि सध्या आपल्यापेक्षा वरचं मानांकन असलेल्या तिघींना हरवण्याची हिंमत दाखवली. तेही बाळंतपणानंतर अवघ्या साडेआठ महिन्यांत. याच कारणामुळं सेरेना विल्यम्स ही सुपर चॅम्पियन आहे.

अखेर उजव्या दंडाच्या दुखापतीनं सेरेना विल्यम्सला फ्रेन्च ओपनची मोहीम अर्ध्यावरच सोडायला लावली. पण या दुखापतीतून लवकरात लवकर सावरून, पुन्हा ग्रँड स्लॅममध्ये खेळण्यासाठी ती अजूनही उत्सुक असावी. कारण मार्गारेट कोर्टचा सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा विक्रम तिला खुणावत आहे. ग्रँड स्लॅमच्या इतिहासात सेरेना विल्यम्सच्या खजिन्यात आता २३ ग्रँड स्लॅम विजेतीपदं जमा आहेत. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या विक्रमापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. ऑल द बेस्ट, सेरेना विल्यम्स.