मुंबई : ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या मोसमातल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होतेय. या स्पर्धेत क्रीडा रसिकांच्या नजरा असणार आहेत त्या प्रामुख्यानं अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सवर. कारण सेरेना मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रमापासून अवघं एक विजेतेपद दूर आहे.


37 वर्ष वय आणि एका मुलीची आई असलेली सेरेना यंदा विक्रमी 24 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानच ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न पार्कवर दाखल झाली आहे.


2017 साली सेरेनानं शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती तेव्हा ती दोन आठवड्यांची गरोदर होती. त्यानंतर गरोदरपणा, बाळंतपण आणि खालावलेल्या फिटनेसमुळे सेरेनाचा खेळ मंदावला. पण मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठून सेरेनानं आपल्या महानतेची झलक पुन्हा दाखवून दिली होती.

सेरेनानं आजवरच्या कारकिर्दीत महिला एकेरीची 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. त्यात विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनची सात, अमेरिकन ओपनची सहा आणि फ्रेंच ओपनच्या तीन विजेतेपदांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक विजेतेपदांच्या विक्रमापासून सेरेना केवळ एक विजेतेपद दूर आहे.

दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सेरेनासाठी यंदाचा ड्रॉ मात्र खडतर आहे. सेरेनाच्या गटात जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असलेली सिमोना हालेप आणि कॅरोलिन प्लिस्कोवाचा समावेश आहे. त्यामुळे सेरेना यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी कामगिरी करते का? याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.