सातारा : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. तिरंदाजीमध्ये भारताने आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली असून पुरुषांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात साहिल जाधव (Sahil Jadhav), कुशल दलाल आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू या भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. या विजयासह आशियाई खेळांमध्ये भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 10 वर पोहोचली आहे. या सुवर्णपदकाच्या विजयात साताऱ्यातील (Satara) मराठमोळ्या साहिल जाधवची कामगिरी लक्षवेधी ठरली. लेकाच्या गोल्डन (Gold) कमाईनंतर वडिलांनी अत्यानंद साजरा केला.
साताऱ्याच्या साहिल जाधवने आर्चरीमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई करत भारताचा नावलौकिक केला. विशेष म्हणजे, साहिलच्या या यशामागे आई-वडिलांचा संघर्ष आणि साहिलच्या त्यागाची मोठी कहाणी आहे. “माझं लग्न आर्चरी खेळाशी झालंय,” असं म्हणत ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केलेल्या साहिलने आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वत:ला सिद्ध केलं. आई-वडिलांचं स्वप्न देखील साकार केलं. विशेष म्हणजे, कधीकाळी साहिलच्या (आर्चरी) धनुष्यबाण खरेदीसाठी आईने स्वत:चं सोनं गहाण ठेवलं, आज लेकाने गोल्ड मेडल जिंकत आईच्या कष्टाचं जीच केलं.
साहिलला धनुष्यबाण घेता यावा, यासाठी त्याच्या आईने स्वतःचं सोनं गहाण ठेवलं होतं. त्या सोन्यातून घेतलेल्या धनुष्यबाणाने आज साहिलने दोन सुवर्णपदकं जिंकली, एखाद्या सिनेमाला शोभेल अशीच वाटचाल साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांची राहिली आहे. आईच्या सोन्याचं त्याने खऱ्या अर्थाने सुवर्णपदकात रूपांतर केलंय. साहिलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्या वडिलांनी एबीपी माझाशी संवाद साधताना अत्यानंद व्यक्त केला.
ऑलिंपिक गाठायचं हेच धेय्य, वडिलांना आनंदाश्रू
ऑलिंपिक गाठायचं ह्या ध्येय्यासाठी साहिलने खूप कष्ट केलं, आम्ही त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहात होतो, तेव्हा माझं लग्न आर्चरीशी झालेलं आहे असे म्हणत त्याने आपल्या खेळावर फोकस केला. मी जोपर्यंत ऑलिंपिकला पोहोचत नाही, त्याच उद्देशाने त्याने प्रयत्न करुन हे यश मिळवल्याची प्रतिक्रिया साहिलचे वडिल राजेश जाधव यांनी दिली. त्याच्या कष्टाचं फलित झालं, काल ड्युटीला असल्यामुळे मला टीव्हीवर बघता आलं नाही, मोबाईलवरच मी त्याची मॅच पाहिली, असे सांगताना वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. साहिलला धनुष्य घेण्यासाठी त्याच्या आईचे दागिने आम्ही गहाण ठेवले होते, तू हळू हळू एक एक पायरी चढून वरपर्यंत पोहोच, जेव्हा वरपर्यंत पोहोचशील तेव्हा पुन्हा खाली येऊ नको असाच सल्ला मी दिला होता, असेही जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर साहिलची छाप
सातारा जिल्ह्यातील साहिलने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. 2025 च्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत त्याने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले होते. आता आशियाई खेळांसारख्या मोठ्या व्यासपीठावर सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत साहिलने आपल्या पदकांच्या यादीत आणखी एका मोठ्या कामगिरीची भर घातली आहे. त्याच्यासोबत कुशल दलाल आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू यांनीही अंतिम फेरीत अचूक वेध घेत भारताच्या सुवर्ण विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताची पदकतालिका
- सुवर्णपदक – 10
- रौप्यपदक – 21
- कांस्यपदक – 27
- एकूण पदके – 58
पदकतालिकेतील स्थान – आठवे
हेही वाचा
