Sarfaraz Khan : सरफराज खानने (Sarfaraz Khan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले आहे. सरफराजला इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सरफराजने केलेल्या खेळीने अवघ्या देशाने डोक्यावर घेतले. त्याने अवघ्या 48 चेंडूत अर्धशतक झळकावले. सरफराजच्या पदार्पणाच्या कसोटीच्या वेळी त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमना जहूरही स्टेडियममध्ये उपस्थित होती. सर्फराज आपल्या कसोटी पदार्पणासाठी 97 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्याचा धाकटा भाऊ मुशीर नुकताच अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 97 क्रमांकाची जर्सी घालून दिसला होता. दोन्ही भावांचे जर्सी क्रमांक सारखेच का आहेत, याचा खुलासा वडील नौशाद खान यांनी केला आहे.






मधल्या फळीत आलेल्या सरफराज खानने कारकिर्दीतील पहिल्या कसोटी डावात 66 चेंडूत 62 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 






'नौ' मधून 9 आणि 'शाद' मधून त्यांनी '7' असा अर्थ काढला


सरफराज खानचे वडील नौशाद खान यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या दोन्ही मुलांचा जर्सी नंबर सारखाच का आहे याचा खुलासा केला. नौशाद यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे जर्सी क्रमांक त्यांच्या नावावर निवडले आहेत. नौशाद म्हणाले की, 'नौ' मधून 9 आणि 'शाद' मधून त्यांनी '7' असा अर्थ काढला आहे. त्यामुळे दोन्ही भावांचा जर्सी क्रमांक 97 आहे. मुशीर खानने 97 क्रमांकाची जर्सी घालून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 2 शतके झळकावली होती.






एकीकडे सर्वांच्या नजरा कसोटी सामन्यात सरफराजकडे लागल्या असतानाच दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत मुशीर खानने याच क्रमांकाची जर्सी परिधान करून थक्क केले होते. मुशीरने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 2 शतके झळकावली होती. अंडर-19 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. विश्वचषकातही त्याने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. मुशीर अष्टपैलू म्हणून नाव कमवत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या