इस्लामाबाद : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने खराब प्रदर्शन केले आहे. बुधवारी टॉन्टनच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 41 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानी संघाच्या खराब प्रदर्शनामुळे देशभरातून पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदवर टीका सुरु आहे.


पाकिस्तानी अभिनेता आणि स्वंयघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान यानेदेखील सरफराज अहमदवर निशाणा साधला आहे. कमाल आर. खानने सरफराजची तुलना पानवाल्यासोबत केली आहे. अकराव्या क्रमांकावरील फलंदाजाला स्ट्राइक दिल्याबद्दल कमालने सरफराजला लक्ष्य केले आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 308 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ 266 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानी कर्णधार शेवटपर्यंत मैदानात होता. परंतु तो सामना जिंकवून देऊ शकला नाही. त्यामुळे या पराभवाचे खापर सरफराजवर फोडलं जात आहे.

सरफराजला लक्ष्य करताना कमाल म्हणाला की, पाकिस्तान चुकून हा सामना हरलेला नाही तर त्यांनी केलेल्या चुकांमुळे ते हरले आहेत. त्यांचा कर्णधार मुर्ख आहे. आपल्या संघाकडे एकही विकेट शिल्लक राहिलेली नसताना सरफराजने शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला हवा होता. सरफराज कर्णधार नव्हे तर पानवाला असायला हवा होता.


बुधवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सलामीवीर वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला 308 धावांचं लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानने निकराचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची एकही मोठी भागीदारी होऊ दिली नाही. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानला हार स्वीकारावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं तीन, मिचेल स्टार्क आणि केन रिचर्डसननं प्रत्येकी दोन पाकिस्तानच्या फलंदाजांना माघारी धाडलं.

देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | एबीपी माझा



त्याआधी, ऑस्ट्रेलियानं या सामन्यात 49 षटकांत सर्व बाद 307 धावांची मजल मारली. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि त्यानं अॅरॉन फिन्चच्या साथीनं 146 धावांची दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाच्या डावाचं वैशिष्ट्य ठरली. वॉर्नरनं 111 चेंडूंत अकरा चौकार आणि एका षटकारासह 107 धावांची खेळी उभारली. वॉर्नरच्या वन डे कारकीर्दीतलं हे चौदावं शतक ठरलं. तर फिन्चनं 84 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह 82 धावांची खेळी केली.